ज्येष्ठ अभिनेत्री आशालता रुग्णालयात

मुंबई (गणेश तळेकर) – ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’ या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होते. येथील सेटवरील २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील फलटण तालुक्यात ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेचं शुटिंग सुरु होतं. ज्या दरम्यान काही कलाकरांना करोनाची लागण झाली. त्यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली. १६ सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे.
फलटण तालुक्यात मागील महिन्याभरापासून माझी आई काळूबाई या मालिकेचं शुटिंग सुरु होतं. आज समोर आलेल्या माहितीनुसार आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होते आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशीही माहिती समोर आली आहे. मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचं शुटिंग करण्यासाठी सुमारे २० ते २२ लोक साताऱ्यातील फलटण येथे गेले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. या सगळ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती जी निगेटिव्ह आली होती.
‘माझी आई काळूबाई’ ही सोनी मराठी या वाहिनीवरची मालिका आहे. या मालिकेत काळूबाईची भूमिका अलका कुबल यांनी साकारली आहे. अलका कुबल यादेखील सेटवर होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. गेल्या महिन्याभरापासून साताऱ्यातील फलटण तालुक्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरु होतं. काही दिवसांपूर्वी या मालिकेतल्या एका गाण्याचं शुटिंग सुरु होतं. त्या दरम्यान एक्स्ट्राजपैकी काहीजणांना कोरोनाची बाधा झाली. ज्यानंतर आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं समजतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here