ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनाने निधन

मुंबई (गणेश तळेकर) – सातारा येथे ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शुटिंगदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ७९ होते. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल मधील कोविड अति दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या, परंतु अति गंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अति दक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. गेले ५ दिवस आणि मृत्यूसमयी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या त्यांचे सोबत होत्या.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू होते. येथील सेटवरील २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आशालता ताईंच्या निधनानं सिनेसृष्टीचं मोठ नुकसान झाल्याचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी म्हटले आहे.
आशालता वाबगावकर ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी १०० हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्यांचा जन्म मुंबईत ३१ मे १९४१ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. ‘अपने पराये’ (हिंदी) हा त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटातील भूमिकेबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते.
आत्मविश्वास, तिन्ही सांज, पकडापकडी, मणी मंगळसूत्र, लेक लाडकी, वन रुम किचन या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक नाट्यगीते गायिली आहेत.
मराठी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू , गुणी कलाकार गमावला – अमित देशमुख
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनाने अष्टपैलू आणि गुणी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री.देशमुख आपल्या आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आशालता वाबगांवकर यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.
आशालता वाबगावकर यांनी आपल्या सोज्वळ आणि सहज अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविला होता.विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here