मोदी सरकारमध्ये फेरबदल?

नवी दिल्ली (उपसंपादक तहरीम वाहिद) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन मुदतीआधीच गुंडाळण्यात आल्यानंतर केंद्र सरकारला आता मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाचे वेध लागले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होऊ शकतो, अशी माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. आगामी काळात बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर बिहारची छाप राहण्याची शक्यता आहे.
केंद्रात मोदी सरकार – २ सत्तेत येऊन सव्वा वर्ष पूर्ण झाले आहे. वास्तविक मागील ऑगस्ट महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे सत्ताधाऱ्यांचे नियोजन होते, मात्र त्यावेळी कोरोना प्रसाराचा वेग झपाट्याने वाढत असल्याने ती वेळ टाळावी लागली होती. सध्यादेखील कोरोना प्रसाराचा वेग मोठा असला तरी अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयांचा असलेला कार्यभार आणि शिवसेना, अकाली दलासारखे केंद्रातील सत्तेपासून दूर गेलेले पक्ष यामुळे मोदी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल करणे क्रमप्राप्त ठरले आहे.
३० मे २०१९ रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांच्याशिवाय ५७ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या तुलनेत १५ टक्के सदस्य मंत्री बनू शकतात. याचा अर्थ ८१ जण केंद्रात मंत्री होऊ शकतात. गेल्या काही काळात शिवसेना आणि अकाली दलाने भाजपपासून फारकत घेतली आहे. अलीकडेच अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी खाद्यप्रक्रिया मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या खात्याचा तात्पुरता प्रभार कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय पाहत असलेल्या नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय आठ मंत्री असे आहेत की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत.
मोदी – १ सरकारच्या काळात मंत्र्यांची संख्या ७० च्या आसपास होती, त्या तुलनेत या सरकारमध्ये मंत्र्यांची संख्या कमी आहे. अनेक खात्यांचा भार कित्येक मंत्र्यांना सोसावा लागत असल्याने त्याचा कामकाजावरही परिणाम होत आहे. त्यामुळेही सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार केला तर काँग्रेसला रामराम ठोकून भाजपवासी झालेले मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणे ही औपचारिकता आहे. मध्य प्रदेशसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात व अन्य काही राज्यातील भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील केले जाऊ शकते.
बिहारमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर बिहारची छाप राहण्याचा अंदाज आहे. संयुक्त जनता दलाच्या काही नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच भाजप पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. संघटनेच्या कामातून मुक्त करण्यात आलेल्या काही लोकांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here