वाढत्या कोवीड रुग्णांच्या संख्येवर उपजिल्हा रुग्णालयात सरकारने दिलेल्या सर्व टेस्ट, सुविधा सुरू करा…
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथील उपजिल्हा रुग्णालयात कोवीड-१९च्या खबरदारीपर उपचारच्या पाश्र्वभूमीवर सरकारने सर्वसामान्य व्यक्तीची आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने ज्या विविध टेस्ट, सुविधा दिल्या आहेत, त्या बंद पडलेल्या टेस्ट लवकर सुरू करत, इतर सुविधा लवकरात लवकर सुरू कराव्यात अन्यथा दोंडाईचा शिवसेना येणाऱ्या काळात आंदोलनाची भुमिका घेईल असा इशारा उपजिल्हा रुग्णालयातील कोवीळ प्रमुख डॉक्टर नरोटे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी कोवीड-१९ चे प्रमुख डॉ. श्री नरोटे यांना दिलेल्या निवेदनाचा विषय असा की, मागील मार्च-२०२० पासुन संपूर्ण देशासह महाराष्ट्र देखील कोरोनाच्या महामारीसोबत लढतोय. आता त्याने दोंडाईचा आणी परिसरात देखील चांगलेच हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना आपल्या जीवाभावाचे लोक गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासन पुर्ण ताकदीने कोरोना समोर उभा आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण सेवेसाठी व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यासोबतच ॲंटीजेन टेस्ट,सीरापी टेस्ट,डी-डायमर टेस्ट आदी शासकीय रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोरोनासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सिडेंट कमांडऱ नेमले आहेत. अनेक महागडी औषधी विकत घेण्याचे अधिकार दिले आहेत,मेस्मा सारखा कायदा लागू केलेला आहे. पऱंतु दोंडाईचा शहर उपजिल्हा रुग्णालयात मात्र या सर्व बाबतीत चौफेर आनंदी आनंद आहे. म्हणजे व्हेंटीलेटर असुनही धुळखात पडले आहेत,ॲंटीजेन,सीरपी,डी-डायमर टेस्ट बंद आहेत. यामुळे रुग्णांना प्रचंड आर्थिक,मानसिक त्रास भोगावा लागत आहे.
दोंडाईचा शहरात गोरगरीब,कष्टकरी,व्यापारी आणी इतर जनतेला त्रास होवू नये म्हणून शिवसेना दोंडाईचा शहर शाखा सदैव तत्पर आहे. आपत्ती नियंत्रक सुदाम महाजन हे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज येथील शिवसेना शाखेने उपजिल्हा रुग्णालयात भेट देवुन प्रभारी अधिक्षक डॉ.श्री.नरोटे यांना व्हेंटीलेटर सुरु करुन आय.सी.यु. सुरु करणे,सर्व टेस्ट त्वरित सुरु करणे आणि रेमीडिसीव्हीर तत्सम महागडे इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. दोंडाईचा शहर आणि परिसरातील जनतेस योग्य – उत्तम आरोग्य सेवा देण्याची मागणी देखील केली आहे.
हे लवकर कार्यान्वित न केल्यास शिवसेना येणाऱ्या काळात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आणि तसे झाल्यास होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधिक प्रशासनाची राहिल अशी इशारावजा सूचना निवेदनाद्वारे केली आहे .
यावेळी निवेदन देताना, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, शहरप्रमुख चेतन राजपूत, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकासेठ, उपशहरप्रमुख विजय भोई, दिपक मराठे, चुडामण बोरसे, राकेश पेटकर, आबा चित्ते, युवासेनेचे शहरप्रमुख सागर पवार, राज ढोले, भुषण चित्ते, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.




