जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले

शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – येथील दोंडाईचा रस्त्यावरील भूषण हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर काल रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कार्यवाही केली. या कारवाईमुळे जुगार अड्डे चालकांचे व अवैध व्यवसाय करणाऱ्यांची झोप उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील परिसरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत कदम आणि परिविक्षाधीन सुनील साळुंके यांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सापळा रचून तसेच स्थानिक पोलिसांना दूर ठेवत ही कारवाई यशस्वी केली आहे . नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. सदर कारवाईत जुगारींकडून 13 लाख १ हजार रुपये रोख रकमेसह 65 लाख 15 हजार रुपये किमतीचे वाहने जप्त करण्यात आली असून एकूण ७८ लाख १६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरती पडलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे समजते.

विक्रांत कदम उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा

सदर कारवाई करताना पूर्णतः गुप्तता पाळण्यात आली होती ,त्यासाठी पोलीस यंत्रणेचे मोबाईल बंद करून जप्त करण्यात आले होते. 22 सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत कदम यांनी साध्या वेशात जुगार अड्ड्यावर जावून ही धडक व कारवाई केली. अचानक पडलेल्या धाडीमुळे जुगारींची चांगलीच भंबेरी उडाली. या ठिकाणी 43 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. बरेच दिवसांपासून शहादा परिसरात असे अनेक जुगाराचे अड्डे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या परंतु त्यावर स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग संबंधित अवैध धंदे विषयी असे अनभिज्ञ कसे? अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांच्याकडून शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी निवेदन देण्यात आले तरीदेखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई का करण्यात आली नाही ?हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतो. गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून धनदांडगे जुगार खेळण्यासाठी येतात ,त्यातून कोरोना संसर्ग वाढ होत नाही का ? असा प्रश्न निर्माण होतो?जुगार अड्ड्यावर झालेली कारवाई समाधानकारक असली तरी जुगार अड्ड्याचे मूळ सूत्रधार कोण ? तसेच जुगार अड्डा ज्या जागेवर सुरू होता त्या जागेचे मूळ मालक कोण ? मालकाला याबद्दल माहिती नव्हती का? त्यांच्यावर पोलिस प्रशासन कारवाई करणार का?असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या मुळावर घाव न घालता केवळ फांद्याच चाचपडण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? तरी कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.यापुढे अवैध व्यवसायांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here