- १५ दिवसातच लग्न मोडण्याचा निर्णय
- पतीने मारहाण केल्याप्रकरणी पूनमची पोलिसात तक्रार
मुंबई (जॉनी वाझ) – वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने या महिन्याच्या सुरुवातीला तिचा प्रियकर सॅम बॉम्बे याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, हनीमूनला गेलेले असताना पतीने मारहाण केल्याचा गंभीर आरोप पूनमने आपल्या पतीवर केला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेली पूनम आात हे लग्न मोडण्याचा निर्णयापर्यंत पोहचली आहे. पूनम पांडे म्हणाली- ‘मी हे अपमानजनक नातं पुढे सुरु ठेवण्याचं ठरवलं होतं. मला वाटत होतं की, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. पण, आता मी हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.’
पूनम पांडे हिच्या म्हणण्यानुसार- ‘या अपमानजनक नात्याच्या बंधनात अडकून राहण्याऐवजी मी एकटं राहणं पसंत करेन. जो माणूस जनावरासारखं मारहाण करतो त्याच्याकडे परत जाण्यात काहीही अर्थ नाही. एवढेच नाही तर त्याने माझे केस पकडून मला पलंगावर आपटलं.’
मिळालेल्या वृत्तानुसार, पूनम पांडे हिचा पती सॅम बॉम्बे याला 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. सॅमला चार दिवसांचा जामीन मंजूर झाला असून, त्याला गोव्याच्या कॅनाकोना पोलीस ठाण्यात हजर व्हावं लागणार आहे.
कॅनाकोना पोलीस स्टेशनचे निरीक्षक तुकाराम चव्हाण म्हणाले की, ‘पूनम पांडे हिने सोमवारी रात्री उशिरा पती सॅम बॉम्बे विरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पीडितेची वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.’
पूनम पांडे यांनी १ सप्टेंबर रोजी सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. पूनमने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली होती. लग्नाआधी हे दोघेही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पूनम पांडे म्हणाली- ‘माझी आणि सॅमची ओळख ही एका प्रोजेक्टदरम्यान झाली होती. यानंतर सर्व काही एका बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटासारखे घडलं. आम्ही दोघेही बर्याच बाबतीत एकसारखे आहोत. तो माझा सर्वात चांगला मित्र आहे.’
सॅम अहमद बॉम्बे अॅड सिनेनिर्माता आहे. अनेक कलाकारांसोबत त्याने अॅड फिल्ममध्ये काम केले आहे. सॅमने दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया आणि क्रिकेटर युवराज सिंहसोबत काम केले आहे. ३६ वर्षीय सॅमचा जन्म २७ जानेवारी १९८४मध्ये मुंबईत झाला होता. सॅमने दुबईत आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
पूनम पांडे ही सॅमी दुसरी पत्नी आहे.पूनमच्या आधी त्याने मॉडेल अली अहमदशी लग्न केले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. मुलाचे नाव ट्रॉय बॉम्बे तर मुलीचे नाव टीया बॉम्बे.
सॅमने २१व्या वर्षी जाहिरात आणि कम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. २८व्या वयात तो दुबईची कंपनी असलेल्या Y&Rचा क्रिएटिव्ह डायरेक्टर बनला. मिळालेल्या माहितीनुसार २०१७मध्ये रिलीज झालेल्या अक्षय़ कुमारचा सिनेमा किंग ऑफ द रिंग सॅमनेच दिग्दर्शित केला होता. याशिवाय अनेक म्युझिक व्हिडिओही त्याने दिग्दर्शित केले आहेत. यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांचे गाणे बेफिक्रा आणि उर्वशी रौतेला व विद्युत जामवाल यांचे गाणे गल बन गई यांचा समावेश आहे. सॅमची आपली प्रॉडक्शन कंपनी बॉम्बे मॅटिनी फिल्म्स आहे.
सॅम आणि पूनम गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी ते लग्नबंधनात अडकले होते. हनीमूनला जातानाचे त्यांचे एअरपोर्टवरील फोटोही समोर आले होते. दरम्यान त्याच्यावर लावलेल्या आरोपांबाबत खुद्द सॅमकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.







