आपल्या आगळ्या वेगळ्या संगीतशैलीने रसिकांना आपल्या सुरांवर झुलविणारे संगीतकार आर.डी.बर्मन

योगेश शुक्ल

याद है पंचम, जब भी कोई धुन बनाकर भेजते थे
तो साथ कह दिया करते थे, ‘ द बौल इज इन योर कोर्ट ‘
ये कौन सा बौल मेरे कोर्ट मेँ छोड़ गये हो तुम…
‘ पंचम ‘ ज़िँदगी का खेल , अकेले नहीँ खेला जाता
हमारी तो टीम है. आ जाओ या बुला लो . . .#गुलज़ार साहब.

१९५०-१९६० चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विशेषतः सुवर्णयुगच होते. कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार या सर्व क्षेत्रात अक्षरशः दादा लोक काम करत होते. नौशाद, मदन मोहन, सलिल चौधरी, अनिल विश्वास, शंकर जयकीशन यांसराखे संगीतकार; बिमल रॉय, ह्रिषी मुखर्जी, गुरूदत, मेहबूब, कपूर कंपनी असे महान निर्माते/दिग्दर्शक; लता, तलत, रफी, मुकेश, किशोर, आशा, असे एकसे बढकर एक गायक मंडळी; बक्षी, मजरूह, शैलेन्द्र, अशी महान गीतकार मडळी; आणि अक्षरशः एकहाती चित्रप्ट गर्दी खेचणारे दिलीप, राज, दत्त, नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, वै. माला, ई. चित्रपट ‘तारे’. या अश्या युगात स्वताचे स्थान स्थापन करणे दूरच ऊलट एखाद्या नव्या कलाकाराला ‘आत प्रवेश’ घेणे देखिल किती अवघड असू शकेल याची कल्पनाच केलेली बरी. तरी या स्पर्धेत हक्काने नुसतेच टिकून न राहता आपल्या आगळ्या वेगळ्या संगीतशैलीने रसिकांना आपल्या सुरांवर झुलवणारा संगीतकार म्हणजे आर.डी.बर्मन उर्फ पंचमदा.
स्वतःचे वडील अतीशय नावाजलेले संगीतकार असताना दडपण व अपेक्षांचे ओझे पंचम सारख्या मुलावर अक्षरशः एखाद्या पर्वताएव्हडेच होते. पण त्या किशोर वयात देखिल आजूबाजूला एव्हडी धामधूम सुरू असताना स्वताच्या कलागुणांवर, मेहेनत आणि कामावर पंचम चा ठाम विश्वास होता
गुरूदत च्या मदतीने पंचम ने मुंबई मध्ये प्रवेश घेतला आणि वडीलांच्या कामात मदतनीस म्हणून काम करू लागला. या काळातही गाणे बनवतानाचा, संगीत फुलवतानाचा ‘थेट’ अनुभव त्याला याची देही याची डोळा मिळत होता. त्यातून अनेक बारकावे त्याला टिपता येत होते- जसे एखादा प्रसंग चित्रपटात असेल त्या अनुशंगाने दादा बर्मन गाण्यात कसे अनुरूप बदल सुचवत असत, प्रयोग करत असत. “छोड दो आचल जमा क्या कहेगा” गाण्याच्या आधी असेच “आह!” असे ऊद्गार आशाच्या तोंडी घालून संपूर्ण गाण्याला एक अवखळ आणि लज्जायुक्त प्रेम्/शृंगाराची अभिव्यक्ती दादांनी बहाल केली होती. एखाद्या पक्षाच्या किलबिलाटावरून पुढील सुरावट सजवण्याची दादांची कला, गाण्यामागील पार्श्वभूमी, प्रसंग ऐकल्यावर त्यावर अभिनय करणे, नाच करणे, अशा दादांच्या हरकती, हे सर्व बारकावे पंचम टिपत होता. एखाद्या कुशल मूर्तीकाराला मूर्ती घडवताना, त्या दगडाचे सुबक मूर्तीत रूपांतर होताना, त्या प्रत्त्येक स्थित्यंतराबरोबरच त्या मूर्तीकारात होणारे बदल, हे सर्व बघणे याचा पंचमच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. एखाद्या वटवृक्षाखाली दुसरा वृक्ष वाढत नाही हे सत्य आहे आणि त्या अर्थाने सचिनदा नावाच्या वटवृक्षाखाली पंचम चे रोपटे रुजत होते, मूळे खोल धरत होती, रोपटे वाढत होते हे खरे असले तरी या रोपट्याला मोठे होण्यासाठी स्वताची ‘जमिन’ आवश्यक होती.
आणि अपघातानेच तशी संधी चालून आली. १९६१ मध्ये सचिनदांना हृदयविकाराचा झटका आल्यावर सर्व मंडळी काम देईनाशी झाली. गुरूदत ने देखिल दादांची साथ सोडली..( ‘बहारे फिर भी आयेगी’ चित्रपटाची पाच गाणी पूर्ण होती व ती सर्व व ऊर्वरीत पूरी करण्यास पंचम ‘सक्षम’ आहे असे सचिनदांनी सांगूनही गुरूदत ने पाठ फिरवली.) देवानंद तेव्हा मदतीला धाऊन आला व सचिन दा बरे होईपर्यंत ‘गाईड’ चित्रपटाचे काम लांबवले.. नंतर अक्षरशः पाच दिवसात गाईड चित्रपटाची सर्व गाणी संपूर्ण झाली.. शैलेंद्र ने बसल्या बसल्या “दिन ढल जाये रात ना जाये”, “आज फिरे जिने की तमन्ना है’, “तेरे मेरे सपने’ ही गीते लिहीली. गाईड च्या संगीत प्रक्रीयेत तेव्हा पंचम ने संगीत दिग्दर्शकाईतकेच काम केले होते पण अर्थातच अधिकृत नाव सचिनदांचे होते. पण पंचम चे ‘काम’ देव आनंद व ईतर मंडळी, खुद्द दादा बर्मन यांच्याही लक्षात आलेच होते त्यासाठी दादांनी पंचमला शाबासकी दिली व आता तू खर्‍या अर्थाने तयार झाला आहेस अशी पावती दिली.
तरिही “अधिकृत रीत्या” संगीतकार म्हणून पंचम नावारूपाला यायला अजून एक अपघात घडायचा होता-गुरूदत च्या ‘राज’ चित्रपटासाठी पंचम ने संगीतकार म्हणून दोन गाणी बनवली आणि काही कारणाने पुन्हा चित्रपट बंद पडला तो कायमचाच. पण त्यातील काही गीते ‘रेकॉर्ड’ केली गेली नव्हती. पंचम चा दोस्त मेहेमूद (‘पडोसन’ वाला) याने त्यातील “घर आजा घिर आये बदरा सावरीया..” हे गीत त्याच्या ‘छोटे नवाब’ (१९६१) चित्रपटासाठी घेतले आणि पंचम ने संगीतकार म्हणून हे पहिले वहिले गीत तेही लताबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केले. पंचम च्या नावामागे ‘संगीतकार’ शिक्का बसला होता.
एव्हडे करूनही, १९६३-६४ पर्यंत पंचमला संगीतकार म्हणून काम मिळाले नव्हते. ‘भूत बंगला’, ‘तिसरा कौन’ अशा न गाजलेल्या चित्रपटात संगीत देऊन देखिल पंचम च्या कलेवर व पंचमकडे लक्ष वेधून घ्यायला १९६६ ऊजाडावे लागले. चित्रपट- ‘तिसरी मंझिल’. त्यातही “शम्मी” हा त्याकाळचा राजा होता.. त्याच्या मर्जीशिवाय चित्रपट सबंधी गोष्टींचे पानही हलत नसे, कोण गाणार, गीतकार कोण, संगीतकार कोण हे शम्मी ठरवत असे. शम्मी आणि शंकर जयकीशन हे समिकरण घट्ट असताना निवळ पंचम च्या हुनर, कला, व कामावर विश्वास असलेल्या खुद्द शंकर जयकिशन यांनी व गीतकार मजरूह यांनी या चित्रपटासाठी पंचम हा योग्य संगीतकार आहे असे शम्मी ला पटवले. पंचम कडून सर्व गाणी एकल्यावर शम्मी ने ‘तूम पास हो गये’ असे प्रशस्तीपत्रक दिले, आणि नासीर हुसैन ला “पंचम कडे जवळपास १०० अधिक ट्यून्स तयार आहेत, त्या ऐक आणि त्यातील आवडतील त्या घे” असे फर्मान सोडून शम्मी निघून गेला आणि पंचम ची गाडी सुरू झाली. आणि अक्षरशः एखाद्या ‘तूफान मेल’ प्रमाणे पंचम च्या कारकिर्दी ने जो वेग घेतला तो घेतलाच.. तिसरी मंझिल चित्रपटातील सर्वच गाणी आजही तब्बल ५० वर्षांनंतर तितकीच लोकप्रीय आहेत! पैकी , “आजा आजा मै हू प्यार तेरा…”,”ओ हसीना जुल्फोवाली’..” ही गाणी तर अजूनही लोकांच्या मनावर गारूड करून आहेत.. त्यातील आशाजींचे ते धृवपदाशेवटी म्हणणे “आहाहा आजा आ आ आ..” हा त्यांच्याही कारकिर्दीसाठी एक ‘ट्रेंड्सेटींग’ ठरले आणि एव्हाना रसगुल्ल्याप्रमाणे मृदू व मिठ्ठास गाणारे रफी साहेब याच गाण्यामूळे देखिल एका वेगळ्याच गायकीच्या प्रांतात विश्वासाने शिरले. त्या अर्थी हा चित्रपट आणि त्यातील गीते ही अनेकांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्याकाळी गाणी हीट – तर चित्रपट हीट असे घट्ट समीकरण होते. गाणी हा त्याकाळी चित्रपटांचा आत्मा होता, प्रत्त्येक गाणे अक्षरशः चित्रपटाचे मुलभूत अंग असल्यासारखेच होते. ‘आयटम’ नंबर किंवा ‘पॉपकॉर्न ब्रेक’ साठी गाण्यांचा वापर हे ‘डिफॉर्मेशन’ २००० शतकासाठी राखीव होते.
हे सगळे एव्हडे बारकाव्यात लिहीण्याचा ऊद्देश एव्हडाच की “तो एक ब्रेक’, ‘ते एक अधिकृत स्थान’ ‘ती एक पहिली लोकमान्यता’ मिळवण्यासाठी पंचम सारख्या संगीतकारालाही खूप झगडावे लागले, वाट पहावी लागली, घाम गाळावाच लागला. पण हे सर्व बहुदा जरूरीचेच होते असे म्हणावे लागेल. त्यामूळे एका रात्रीत मिळालेले यश, प्रसिध्दी अशी धोकादायक सुरूवात व बहुतांशी अल्पायुषी वाटचाल न होता, एका खडतर तपश्चर्येसाठी पंचम तयार झाला होता, घडत होता.
In Today’s world people would have said Pancham has arrived! Back then people said Pancham has “started”! तीच प्रतिभा, तीच मेहेनत, तोच दर्जा, पण त्याच्या मूल्यमापनाची परिमाणे व तराजू यातील फरक केव्हडा मोठा आहे, त्याकाळी व आता.
एकीकडे पंचमची वडीलांकडील शाळा चालूच होती.. निवळ गाण्याचे मुखडे बनवून ऊर्वरीत गाणे पंचमला वा ईतर असिस्टंट ना बनवायला देणे, त्याच्या अतीऊत्साहाला लगाम घालणे, घरातल्या नोकर चाकरांना ऐकवून गाण्याच्या ‘साधेपणा, लोकप्रियता, मास अपिल’ ई. बाबत निर्णय घेणे, पंचम ला ज्या ट्यून्स अक्षरशः स्वप्नात दिसत असत, कानात ऐकू येत असत त्या त्याला रेकॉर्ड करायला लावणे’ या अशा बारीक सारीक गोष्टींतून सचिनदा पंचम या हिर्‍याला पैलू पाडत होते. या शाळेतील कामातूनच पंचम ला दुसरी महत्वाची असाईंनमेंट मिळाली.
आराधना (१९६९) चित्रपटामधील गीते पूर्ण करण्यात सचिनदांना पंचम ने सहाय्य केले हे आता जगजाहीर आहे. किंबहुना ‘कोरा कागझ था ये मन मेरा’ हे संपूर्ण गीत पंचमनेच केले आहे. ते पाहूनच पंचम ला शक्ती सामंता यांनी कटीपतंग (१९७०) चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवली. आराधना या चित्रपटामूळे किशोरदांच्या पार्श्वगायनाच्या लाँग इनींग ला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली हे मान्य केले तरी कटीपतंग च्या प्रदर्शनानंतर पंचम-किशोर या जोडगोळीच्या कारकिर्दीला देखिल एक ‘लोकमान्य’ सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल. त्या आधी पडोसन (१९६८) चित्रपटात किशोर कुमार व मेहेमूद बरोबर ‘ एक चतुर नार’, ‘केहेना है’ अशी लोकप्रिय गाणी, प्यार का मौसम (१९६९) मधिल ‘तुम बीन जाऊं कहा’ हे गीत अशी गाणी पंचम ने केली असली तरी फक्त व फक्त किशोर आणि पंचम हे समीकरण ‘कटी पतंग’ मुळे घट्ट झाले. अर्थातच यात पडद्यावरील राजेश खन्ना चा वाटा देखिल तितकाच महत्वाचा. पैकी, “ये शाम मस्तानी”, “खेलेंगे हम होली”, या गीतांनी बिनाका गितमालिका, रेडीयो सिलोन ई. सर्व रेडीयो चॅनल्स वर पुढील अनेक काळ आपले स्थान सर्वोच्च ठेवले. आजही होळीच्या दिवसात “खेलेंगे हम होली..” हे गाणे सर्वत्र वाजवले जाते.
पडद्यावर ‘कका’ ऊर्फ राजेश खन्ना, गायक किशोर कुमार, आणि संगीतकार पंचम या त्रिकूटाने नंतर चित्रपट’संगीत’ सृष्टीवर अक्षरशः कब्जा केला. पैकी अमर प्रेम (१९७१), अपना देश (१९७१), मेरे जीवन साथी (१९७२), नमक हराम (१९७३), आपकी कसम (१९७४), अजनबी (१९७४), मेहबूबा (१९७६) या चित्रपटांची गाणी, काकाच्या भूमिका ई. सर्व गाजले पण सर्वच चित्रपट मात्र व्यावसायिक दृष्ट्या तितकेसे चालले नाहीत. या सर्वच चित्रप्टातील सर्वच गाणी अक्षरशः ‘ऑल टाईम हीटस’ या यादीत येतात..
पैकी खालील काही कायमचीच लक्षात राहणारी गाणी..
दिवाना लेके आया है दिल का तराना.., चला जाता हूं किसी की धून मे.. (मेरे जीवन साथी)
नदिया से दरीया… मै शायर बदनाम…. (नमक हराम)
झिंदगी के सफर मे गुजर जाते है… जय जय शिव शंकर… (आपकी कसम)
एक अजनबी हसीना से… भिगी भिगी रातों मे.. (अजनबी)
अमर प्रेम मधिल सर्वच गाणी..
किंबहुना नमक हराम चित्रपटानंतर नंतर राजेश खन्ना पर्व संपून ‘जंजीर’ (१९७३) चित्रपटातून अमिताभ बच्चन नावाचे नवे पर्व सुरू झाले होते. माझ्या मते अमिताभ पर्वात चित्रपट संगीत सृष्टीमध्ये एक अमूलाग्र बदल घडून आला तो या अर्थी की त्याच्या बर्‍याचश्या चित्रपटात हिरो हिरॉईन ची ड्युएट गीते, लव्ह साँग्स, गोंधळ/जल्लोश, धांगडधिंगा गाणी यांचा भरणा अधिक होता. अर्थात यात दोष अमिताभचा नव्हे तर एकंदरीत तेव्हाच्या पाश्चात्य, हिप्पी कल्ट्स, ई. चा प्रभाव आपल्या चित्रपट सृष्टीवर पडत होता. म्हणजे १९६-७० च्या दशकात माधुर्य, मुख्यत्वे दु;खी, प्रेम गीते किंवा ईतर अपवादाने आलेली समूह वा जल्लोश गीते हाच मुख्य संगीत साचा होता. मात्र १९७५ च्या नंतर चित्रपटसंगीत हे नाच, ‘दृष्य’, ऑर्केस्ट्रेशन या अंगाने अधिक बहरू लागले. त्यातही ‘पार्श्वसंगीत’ या एव्हाना सूप्त असलेल्या प्रकाराने अचानक ‘शोले’ (१९७५) चित्रपटाच्या माध्यमातून एक पुनर्जन्म घेतला.
सर्व प्रस्थापित, व नेहेमीच्याच वाटा चोखाळणार्‍या संगीतकारांसाठी खरे तर हे आव्हान होते, एक अमूलाग्र बदल होता- पण बरेच जण त्यासाठी तयार नव्हते. किंबहुना असे संगीत देण्यासाठी लागणारी सर्व संगीत साधने, तंत्र, जागतीक संगीताची अभीरुची व ज्ञान, ई. सर्वाबद्दल ऊदासीन दृष्टीकोन व अभाव हा त्याकाळच्या संगीतकारांत दिसून येत होता. यात ओ.पि. नय्यर, विश्वास, चौधरी, नौशाद या सर्वच मंडळींचा समावेश होता. त्यांच्या प्रतीभा व क्षमतेबद्दल वाद नव्हताच पण कालानुसार आपले संगीत बदलण्याची कला, वा ‘कळ’ त्यांच्यात तितकीशी नव्हती. अशातून मग या प्रकारच्या संगीताला नुसते धिंगाणा संगीत, वेस्टरर्नाईझ्ड संगीत, कर्णकर्कश्य संगीत अशी लेबलं दिली गेली. या सर्व प्रकारच्या संगीत बदलावर व लाटेवर स्वार होणारा एकच गडी होता- आर. डी. बर्मन ऊर्फ पंचम.
थोडक्यात , १९७५ च्या नंतर मारधाड, मसाला अशा चित्रपटांच्या जमान्यात चित्रपटाचा फोकस हा निवळ मधुर संगीत नसून किंबहुना त्यापासून हटकून मल्टिस्टार कास्ट, पटकथा, चित्रकथा-फॉर्म्यूले, अ‍ॅक्शन अशाकडे वळला. तरिही चित्रपटातील गाणी ‘हीट’ होणे आवश्यकच होते. फक्त त्यांचा चित्रपटातील संदर्भ व प्रेक्षकाच्या अभिरुचिचा संदर्भ बर्‍याच अंशी बदलला होता. स्वातंत्र्या नंतरची पहिली ‘तरूण पिढी’ प्रेक्षक म्हणून त्याकाळच्या संगीताचा दर्जा, भविष्य ठरवत होती. ‘अधिक तालब्ध्द’ (rythm based) संगीत लोकांना आवडू लागले होते. अशा मसाला व मल्टीस्टारर चित्रपटात प्रामुख्याने अमिताभ, शशी कपूर, धरमेंद्र, रिशी कपूर, शत्रुघन सिन्हा मग संजय दत (रॉकी -१९८१ व नंतर), सनि देओल (बेताब-१९८३ व नंतर) अशा अनेक हिरो मंडाळींसाठी पंचम ने अनेक हीट गाणी दिलेली आहेत- त्यातही किशोर कुमार, आशा हा धागा कायम आहेच.
दरमान, १९७५ च्या आसपास पंचम ने गीत संगीतातील मंत्र व तंत्राची मक्का म्हणजे अमेरिकेतील लॉस एंजेलीस ला भेट दिली होती. तिथे व शिकागो सारख्या अमेरिकेतील सांस्कृतीक शहरांतून भ्रमण करताना पंचम ने एकंदर जॅझ संगीत, ध्वनिमुद्रण तंत्र, ऊपकरणे, ‘सिंथेसाईझ्ड साऊंड’ ईत्यादी बद्दल भरपूर माहिती करून गेतली होती. भारतीय चित्रपट्सृष्टीचा पुढील काळ हा अशा मंत्र-तंत्राच्या मिलाफातूनच पुढे सरकणार आहे हे त्याने जाणले होते. एका संगीतकाराच्या दीर्घायुषी कारकिर्दीमागे हे ‘द्रष्टेपण’ दडलेले आहे. एल्व्हिस, अब्बास (मामा मिया), फ्रांसिस लेई, सर्जिओ लेयोन, चबि चेकर, डेमी रौस, ई. अनेक नावाजलेल्या पाश्चात्य संगीतकार गायक मंडळींकडून प्रेरणा घेऊन पंचम ने काही ऊत्कृष्ट गीते बनवली आहेत. पाश्चात्य संगीताच्या या खजिन्याने निवळ हरपून न जाता त्याचा भारतीत चित्रपट संगीतात नेमकी कसा, कधी, व कुठे वापर करता येईल हा पुढील विचार आर.डी. बर्मन मधिल स्वतःला बदलत्या काळाशी कायम ‘अवगत’ ठेवणार्‍या कलाकाराने केला आणि त्यातूनच निर्माण झालेल्या ‘मेहबूबा मेहबूबा..’ (शोले १९७५), ‘यम्मा यम्मा’ (शान- १९८०), “सपना मेरा टूट गया’ अशा गीतांनी (खेल खेल मे १९७५), तर हम किसी से कम नही (१९७७), द बर्निंग ट्रेन (१९८०) सत्ते पे सत्ता (१९८१), बडे दिलवाला (१९८३) मधिल गीतांनी तरूण पिढीला अक्षरशः वेडं करून सोडलं. पंचमच्या संगीत कारकिर्दीमधिल १९७५ ते १९८० चे दशक व काळ हे “वेस्टर्न” गीत संगीताचा प्रभाव, ‘पंचम कॉपी करतो’, अशा एक ना अनेक वाद विवाद वा कुतूहलांनी गाजला. गंमत म्हणजे, “माझ्यावर जॅझ चा प्रभाव आहे.. पाश्चात्य संगीतातील मला जे आवडते, जे अभिनव वाटते ते मी घेतो, विश्वातील सर्वच सूर माझ्या प्रेरणेचे स्त्रोत आहेत..” असे खुद्द पंचम ने अनेक वेळा मान्य केले आहे. मुळात पंचम सारख्या कलाकाराला बाजारातून संगीत ‘ऊचलण्याची’ गरज नव्हतीच पण त्या काळच्या गरजेचे पाणी भारतीय चित्रपट संगीताच्या विहिरीत जन्मजात फुटत नसल्याने अर्थातच साता समूद्रापलिकडले पाणी असे कालव्यातून ईकडे वळवण्याचे काम मात्र पंचम ने संधी मिळेल तेव्हा व गरज असेल तेव्हा केले. आणि हे म्हणजे रेशन च्या रांगेत ऊभे राहून घासलेट आणण्याएव्हडे सोपे काम नक्कीच नाही! आज ‘ती’ सर्व गाणी त्यांचा आत्मा, त्यांचे प्रकटीकरण, या सर्वांवर एक निश्चीत ‘पंचम ठसा’ आहे ईतका की ती गाणी लोकप्रिय झाल्यावर मागाहून “अरे हे अमुक गाणे तर त्या तमुक पाश्चात्य गाण्यासारखे वाटते” असा शोध घेतला गेला.. खरे तर दोन्ही बाजूंसाठी हे एक वरदानच म्हणायला हवे.
एरवी, cross training, cultural exchange, knowledge transfer अशा मोठ मोठाल्या वजनदार शब्दांनी आपण २० व्या शतकातील जवळ जवळ सर्व कॉपी वा ऊचलल्या गेलेल्या कलाकृतीस, अगदी संशोधन प्रबंधास देखिल मान्यता देतो पण त्या वेळी जे भारतात सहज ऊपलब्ध नव्हते, त्याचा अभ्यास करून, त्याच्या मुळाशी जाऊन, त्यातून प्रयोग करून पुन्हा आपल्याच संगीत सृष्टिला पंचम ने दिलेले योगदान याकडे मात्र निव्वळ ‘प्रेरणा’ म्हणून न पाहता संशयात्मक नजरेने पाहण्याची आपली जुनी खोड आहे. असो तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. ईथे ते मुद्दामून नमूद करण्यामागे हेतू हाच की पंचमच काय पण कुठलाही कलाकार हा चतुरस्त्र, परीपक्व होण्यात भोवतालच्या सर्व परिस्थितीचा, सामाजिक, सांस्कृतिक परिघ व स्थित्यंतरांचा मोठा वाटा असतो हे अधोरेखित करणे हा आहे.
१९७५ च्या सुमारास स्वताचे स्थान हळू हळू बळकट करताना, नंतर वर लिहीले तसे मसाला चित्रपटातही ‘हिट’ गाणी देताना, पंचमच्या नशीबाने ‘गुलजार’ ऊर्फ संपूरण सिंग नावाच्या ईसमाशी परिचय झाला आणि पंचम च्या आतला संगीतकार खर्‍या अर्थाने बहरला. तसे दादा बर्मन ना असिस्ट करताना गुलजार व पंचम एकत्रीत भेटत असतच पण मुद्दामून गुलजारच्या निर्मितीसाठी संगीत देणे या अर्थाने त्यांचे व्यावसायिल संबंध साधारण १९७० च्या नंतर जुळले. अर्थात, गुलजार निव्वळ स्वांतसुखाय चित्रपट बनवत होता असे मुळीच नाही, ऊलट व्यावसायिक व मसाला चित्रपटांच्या धामधूमीत चित्रपट कलेच्या मुळाशी असलेला आत्मा, प्रेक्षक व कलाकार यांमधील नातेसंबंध, पडद्यावरून कलाकाराची अभिव्यक्ती व संदेश लोकांपर्यंत पोचवण्याची प्रामाणिक खटपट करणारा गुलजार हा एक हाडाचा कलाकार होता. त्यातही स्वतः गीतकार, ऊत्कृष्ट गझलकार, दिग्दर्शक, ई. भूमिकेत असल्याने दर्जाशी तडजोड नाही या त्याच्या तत्वामूळे पंचम कुठलेही व्यावसायीक ओझे न घेता त्याच्याबरोबर मुक्त काम करू शकला.
‘परिचय’ (१९७२) हा गुलजारचा पहिला चित्रपट. त्यातील “सारे के सारे…”, “मुसाफिर हूं यारो..”, या गाण्यात किशोर दा असताना ‘बिती ना बिताई रैना’ या गाण्यात भूपेंद्र सारख्या नव्या गायकाला पंचम ने संधी दिली. याकडे निव्वळ नविन लोकांना संधी देणे हा पंचमचा गुण म्हणून पहाणे अगदीच कमीपणाचे आहे. यामागे पंचम मधिल एक परीपूर्ण संगीतकार होता ज्याला “कुठल्या गाण्यासाठी कुठल्या गायकाचा आवाज योग्य ठरेल” हे पक्के माहित होते आणि त्या विश्वासाशी तो प्रामाणिक होता. त्या गाण्याला आवश्यक दु;खद किनार, एक शास्त्रीय्/गझल बैठक, वडील (संजीव कुमार) व मुलगी (जया) यांमधिल आवाजात आवश्यक असलेला खर्जातील भेद, ई. सर्व पडद्यावर हे गाणे पहाताना आपल्याला भिडते. नेमके हेच संगीतकार म्हणून पंचमचे वेगळेपण आहे. त्याही पलिकडे निव्वळ गाण्याच्या एकंदर कंपोशिझन बद्दल काय लिहावे? सितार, बासरी, सरोद, स्ट्रिंग गिटार चा रिदम किंवा ठेका देण्यासाठी केलेला वापर, तबला, निवळ याच्या आधारावर पंचम ने या गीताला ऊच्च दर्जावर नेऊन सोडले आहे. गुलजार-पंचम च्या पुढील जोडीच्या कारकिर्दीची ही नांदीच होती. आणि त्या समीकरणात आणखिन एका नावाची भर पडली- लता मंगेशकर. त्याआधी पंचम ने लता बरोबर गाणी केली होतीच (अमर प्रेम, कटी पतंग, प्यार का मौसम) पण गुलजार च्या पुढील सर्व चित्रपटांत लता ने पंचमसाठी गायलेली अनेक गाणी हे आजही ‘बेंचमार्क’ म्हणून पाहिली/ऐकली जातात.
लताच्या आवाजाची ढब, थेट काळजाला छेडणारा तीचा सूर, लताच्या गायकीतील ठेहराव, गळ्यातील बारकावे, भाव, आणि यासम दुसरे नाही असे कर्णमाधुर्य याचा पंचम ने ईतका खूबीने व नेमका वापर केला आहे की हे गाणे फक्त लताच्याच तोंडी शोभेल असे ऐकल्यावर खात्री पटते. त्यापैकी काही कायम लक्षात राहणारी….
“तेरे बिना झिंदगी से कोई शिकवा…” आंधी (१९७५), “दो नैनो मे आसू भरे है.. “, खुशबू (१९७५), “नाम गूम जायेगा”… किनारा (१९७७), “तुझसे नाराज नही झिंदगी..” मासूम (१९८२)
“सिली हवा छू गयी”… लिबास (१९८८), “कुछ ना कहो…” (१९४२ लव्ह स्टोरी)
तर गुलजार व्यतिरीक्त ईतर चित्रपटांतून देखिल पंचम ने संगीतबध्द केलेली व लता ने गायलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, पैकी- “बाहो मे चले आ”.. अनामिका (१९७३), “रिमझिम गिरे सावन “(मंझिल १९७९), “मेरे नैना सावन भादो..” (मेहबूबा). त्यातही, रिमझिम गीरे सावन व मेरे नैना हे किशोरदांच्या तोंडी असूनही लता चे व्हर्शन स्वता:ची वेगळी छाप सोडणारे आहे. तेच शब्द, तीच चाल, तोच वाद्यमेळा, पण निव्वळ गाण्याचे एकंदरीत चलन/ठेका बदलून पंचम ने तीच गाणी लताच्या तोंडून अतीशय वेगळ्याच खुबीने समोर ठेवली आहेत. अगदी खोलात जाऊन विचार केला आणि संवेदनांच्या खिडक्या थोड्या अधिक ऊघडल्या तर लक्षात येईल- किशोरदांच्या तोंडी असलेले गीत हे त्यातला नायक (अमिताभ) एका घरगुती मैफलीत मनातील गोष्ट, प्रेम हळूच ऊघडे करतो आहे.. त्याच्या भावना हळू हळू व्यक्त होत आहेत- ठेका तसा मध्यमच आहे. तर लताच्या आवाजातील गीत हे बेभान पावसात अक्षरशः कसलीही तमा न बाळगता तो पाऊस अंगावर घेत आपल्या प्रियकराशी सलगी करू पाहणार्‍या नायिकेचे प्रतीक आहे- अर्थातच प्रेयसीच्या मनात ऊचंबळून आलेल्या भावना, मागे अल्लड तुफान पाऊस अश्या वेळी पंचम ने काय मस्त वेगवान ठेका दिला आहे.. (ती क्लिप पहाच! मुंबईतला पाऊस अनेक चित्रपटांमधून ईतका सुंदर आजवर दिसलेला नाहीच!). एकाच गाण्यासाठी, पण दृष्य व भावना यांच्या अनुशंगाने एव्हडा विचार व सहज बदल, अनुभूतीने परिपक्व झालेला एखादा संगीतकारच करू शकतो.
लता-पंचम-गुलजार या समीकरणाखेरीज गुलजार बरोबरच्या कारकिर्दीत (गुलजार हा चित्रपट गिग्दर्शक, वा गीतकार, निर्माता या भूमिकेत) पंचम ने संगीतबध्द केलेल्या गाण्यांची खूबी ही आहे की त्यात भारतीय व पाश्चिमात्य वाद्य व संगीताचा एक ऊत्कृष्ट मेळ आढळतो. The Best of Both Worlds Mixed असे काहिसे याचे स्वरूप आहे. त्याच बरोबर प्रयोगशीलता देखिल आढळून येते. ऊदाहरणादाखलः
१. तुझसे नाराज नही झिंदगी- अख्खे गाणेच गिटार लिड्/स्ट्रींग गिटार च्या तुकड्याने सुरू होते. मध्ये मध्ये बेस गिटार ची भरण, जोडीला सितार, बासरी, आणी पुन्हा एक्दा झायलोफोन्स.. कुठेही मूळ गीताच्या धब्द व आत्म्याला धक्का न देता हा वाद्यमेळा भारतीय-ईंग्रज असे आपले मूळ विसरून एक होऊन जातो.
२. आजकाल पांओ जमीपर नही पडते मेरे (घर १९७८)- यातही सुरुवातीचा लताचा आलाप/गुणगुणणे आणि नंतरचा अख्खा म्युझिक तुकडा अक्षरशः पुढे येणार्‍या शब्दांमधील गूढत्वाला व शृंगाराला एक जमिन देतो. तो तुकडा ऐकून्/आठवून पहा आणि तेव्हाच “क्यूं नये लग रहे है ये धरती गगन…” (१९४२ लव्ह स्टोरी) चा असाच सुरुवातीच तुकडा आठवून पहा- दोन्हीत प्रचंड साम्य आहे, दोन्हीच्या शब्दात एक गूढगर्भी शृंगार आहेच.. पंचमसे असे बरेच तुकडे, गाणी ही एकातून एक सहज मिसळत जातात, त्याबद्दल आणि पंचमच्या प्रयोगशीलतेबद्दल याच लेखाच्या “तंत्र आणि मंत्र” या पुढील ऊप- विभाग/परिच्छेदात
अधिल विस्ताराने ऊल्लेख येईलच.
थोडक्यात, ज्या काळात पंचम हा ईतर मसाला चित्रपटातून ताल वा रिदम चा फोकस ठेवून हीट्स देत होता त्याच काळात गुलजार बरोबर अक्षरशः संगीत समुद्राच्या तळाशी बुडी मारून नव नविन रत्ने बाहेर काढत होता. हे म्हणजे एकाच क्रिकेटपटूला आज तुला कसोटी सामना खेळायचा आहे, ऊद्या एकदिवसीय आणि परवा २०/२० चा, आणि सर्व सामन्यात तुला यशस्वी व्हावेच लागेल असे सांगण्यासारखे आहे. मुळात तंत्र व गुणवत्ता कितिही असली तरी अशा वेळी मानसिकता, शरीर, एकंदर अ‍ॅप्रोच जसा दर वेळी बदलावा लागतो तसेच पंचमलाही करावे लागले असेल.. आणी या सर्वात परत संगीतकार म्हणून प्रत्त्येक फॉर्मॅटशी प्रामाणिक राहणे याला पर्याय नाही. हे येर्‍या गबाळ्याचे काम तर नव्हेच पण भल्या भल्या पंडीत लोकांना देखिल हे जमलेले नाही. पंचमच्या आई ज्या स्वतः दादा बर्मन चे सहाय्यक म्हणूनही काम पहात असत त्या विचारतात, “असे कुठल्या संगीतकाराचे ऊदाहरण आहे जो एकावेळी ‘मेहबूबा मेहबूबा’ असे गीत बनवतो तर दुसरीकडे ‘बिती ना बिताई रैना” हे रागावर आधारीत गीतही बनवतो?
पंचम च्या या वाटचालीत एव्हाना स्वतः पंचम व त्याचे संगीत जितके वेगाने पुढे जात होते तितकेच पंचमच्या प्रयोगशीलतेला व अक्षरशः ३६० अंशातून फिरणार्‍या प्रतीभेला न्याय देणारा तितकाच “फिरता” गळा आणि कुवत देवाने आशा भोसले नामक गायिकेच्या रूपाने निर्माण केला होता. पंचम बरोबरील स्वताच्या सांगितीक वाटचालीबद्दल एका मुलाखतीत आशाताई म्हणतातः
..” माझ्या संगीत वाटचालीचे तीन टप्पे आहेत. पहिल्यात ओ.पि. नय्यर ने माझ्या गळ्यातील खालच्या (खर्जातील) सुरांचा वापर, विचार केला. दुसर्‍या टप्प्यात शंकर जयकीशन यांनी जे मी आधी सिध्द केले होते तेच पुढे नेले, पण तीसर्‍या टप्प्यात मात्र केवळ पंचमनेच माझ्यातील गायक व गायकीची सर्व अंगे व कुवत याचा पूर्ण्पणे वापर, विचार व विस्तारही केला. मी स्वतः खालच्या ‘प’ पासून वरच्या ‘प” पर्यंत गाऊ शकते हे पंचम बरोबर काम केल्यावर मला ऊमगले. ”
आशाताईं मध्ये एक गायक म्हणून नेमकी कुठले गुण तुम्हाला दिसले असा प्रश्ण पंचम ला विचारला गेला त्यावर त्याचे ऊत्तर असे होते:
..”निव्वळ गायकीच नव्हे तर ऊत्तम नकलाकार व ऊत्तम अभिनय करणे या दोन गुणांमूळे आशा ईतर गायकांपेक्षा या बाबतीत निश्चीतच वेगळी, विशेष ठरते. वैयक्तीक आयुष्यातही ती तितकीच अवखळ, ऊत्साही, मिश्कील, असल्याने एखाद्या सवाल जवाब किंवा छेडखानी सारख्या गाण्यात ती तितक्याच सहजतेने “एक्स्प्रेशन्स” देऊ शकते. आणि त्यात जोडीला किशोर दा असतील तर एक संगीतकार म्हणून माझ्या प्रतीभेवर कसलेच बंधन नसायचे… त्यातूनच सीता और गीता मधिल “हवा के साथ साथ…” या गितांतील य दोघांचा संवाद, ट्युनिंग… किंवा “भली भली सी एक सुरत भला सा एक नाम..” (बुढ्ढा मिल गया) सरख्या गाण्यांमध्ये मस्ती, मधले शब्द, आयत्या वेळी सुचलेले एक्स्प्रेशन्स हे सगळं अगदी सहज करता येत असे..”
मला वाटते या वरील दोन्ही ऊत्तरात आशाताई व पंचम यांची अनेक वर्षांची एकत्रित व यशस्वी संगितीक वाटचालीचे रहस्य दडलेले आहे….
आशा बरोबर पंचम ने खरे तर सुरुवात केली ती “आजा आजा मै हू प्यार तेरा”, “पिया तू अब तो आजा” सारख्या रॉक अ‍ॅड रॉल व कॅबरे गाण्यांपासून. त्यातही पंचम चे प्रत्त्येक आव्हान तितक्याच ताकदीने पेलायची जीद्द आणि त्यातून दोघांच्यात एकमेकांच्या कामाबद्दल निर्माण झालेला आदर, विश्वास हा त्यांच्या पुढील अनेक हीट व सदाबहार गाण्यांमधून दिसून येतो. आशा बरोबर पंचम ने मध्येच गाण्याचा ठेका बदलणे, हार्मनी, संवादात्मक गाणी, पाश्चिमात्य, जॅझ धाटणीची गाणी असे अगदी सहज ऊस्फूर्तपणे प्रयोग केलेले दिसून येतात.
मेरा नाम है शबनम .. प्यार से लोग मुझे शब्बो कहते है (कटीपतंग)
दुनियामे लोगों को (अपना देश)
ओ मेरी जा मैने कहा (आशा, पंचम एकत्र) (द ट्रेन)
मेरी नझर है तुज पे (द बर्निंग ट्रेन)
थोडे डिस्को टाईप चे: जानेजा.. ओ मेरी जानेजा.. निशा (सनम तेरी कसम)

– (९६५७७०१७९२) www.marathinajarana.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here