मिरजेत १२० किलो गांजा जप्‍त; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (नियाज जमादार) – गांजा तस्करी प्रकरणात फरार असलेल्या संशयिताला जेरबंद करण्यात आले. शनिवारी डीसीआयबी (बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग) पथकाने मिरज येथून 120 किलो गांजा, कार व दुचाकी असा एकूण 28 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. अश्पाक मैनुद्दिन मुल्ला (वय 43, रा. दर्गा चौक माळी गल्ली मिरज) असे गजाआड केलेल्या संशयिताचे नाव आहे.
अश्पाक हा तेलंगणा येथून गांजाची तस्करी करून बेळगाव व धारवाड जिल्ह्यात पुरवठा करत होता, अशी धक्‍कादायक बाब पुढे आली असून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यास पथकाला मोठे यश मिळाल्याने जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.
गेल्या महिन्यात चिकोडी पोलिसांनी गांजा तस्करीप्रकरणी एकाला अटक केली होती. यातील मुख्य व दुसरा संशयित अश्पाक फरार झाला होता. त्याला जेरबंद करण्याची जबाबदारी डीसीआयबी पथकाचे सीपीआय निंगनगौडा पाटील यांच्यावर होती. त्यानुसार पथकाने गेल्या चार दिवसांपासून खास खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाटील यांनी मिरज येथे सहकार्‍यांच्या मदतीने सापळा रचला होता. शनिवारी अश्पाक कार व दुचाकीवरून गांजा तस्करी करत असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तस्करीबाबत कबुली दिली.
अश्पाक मुल्ला हा गेल्या दहा वर्षांपासून गांजा तस्करीमध्ये आहे. प्रथमच सांगली व मिरज पोलिस वगळता बेळगाव पोलिसांनी मिरज येथे चार दिवस मुक्‍काम करून आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये कार्यरत असलेल्या अश्पाकला गजाआड केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here