भाजपाच्या नव्या सरचिटणीसाचं वादग्रस्त विधान
पश्चिम बंगाल – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी काल नियुक्ती झाल्यानंतर आज अनुपम हाजरा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. जर मला करोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन असं विधान त्यांनी केलं आहे. पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.
रविवारी २४ पगगणा जिल्यातील बरुईपूर येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हाजरा आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मास्क लावले नव्हते तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले नव्हते. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस अनुपम हाजरा म्हणाले, आमचे कार्यकर्ते कोविड-१९ पेक्षा अधिक मोठ्या संकटाशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जींसोबत लढत आहेत. ते अद्याप करोनाची बाधा झालेली नाही त्यामुळे त्यांना कोणाचीही भीती नाही.
हाजरा पुढे म्हणाले, जर मला करोनाची बाधा झाली तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन. त्या या महामारीच्या पीडितांसोबत खूपच चुकीच्या वागल्या आहेत. त्यांचे मृतदेह केरोसीन टाकून जाळण्यात आले. आपण अशा प्रकारे कुत्रे किंवा माजरांसोबतही वागत नाही. हाजरा यांच्या या विधानानंतर तृणमूल काँग्रेसने यावरुन हाजरा यांच्यावर टीका करताना त्यांचं हे विधान म्हणजे मानसिकदृष्ट्या अपरिपक्वतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.







