पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यातील शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डॉक्टारांनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी रुग्णालयातून एक महिला गायब झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस व नातेवाईकांनी शोध घेतला असता, संबंधीत महिला शनिवारी बोपदेव येथील घाटात मिळून आली आहे. त्यामुळे नेमकं कोविड सेंटरमध्ये चाललयं तरी काय अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर व आरोपी डाॅक्टर हे शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात काम करतात. दोन दिवसापुर्वी महिला डॉक्टर कर्तव्यावर असताना, त्यांच्याशी दोघा आरोपींनी अश्लिल वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. या बाबात फिर्यादी डॉक्टर तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी दुपारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील एक महिन्यापासून डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार सुरू होता. त्यांनी वारंवार तेथील प्रशासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्याची देखील माहिती सुत्रांनी दिली आहे.







