आता कोरोनावरील इंजेक्शनमध्येही भेसळ…

corona-vaccine

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – कोरोनावरील भेसळ केलेल्या इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी दिल्लीतील एका केमिस्टला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अजय शामलाल नासा (40) असे या केमिस्टचे नाव असून त्याच्याकडून भेसळ केलेल्या पंधराहून अधिक इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. प्रत्येक इंजेक्शनसाठी तो एक लाख रुपये घेत होता. महाराष्ट्रात दाखल झालेला इंजेक्शन भेसळीचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यांत उत्तराखंड परिसरातून मुंबई शहरात करोनावरील इंजेक्शनच्या काळा बाजारप्रकरणी आझम नजीर खान या आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी इंजेक्शनचे पंधराहून अधिक बॉक्स जप्त केले होते. हे इंजेक्शन कोरोनाबाधित रुग्णांना शरीरात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यावर दिले जाते. कोरोना रुग्णांसाठी ते अत्यंत उपयुक्‍त इंजेक्शन आहे.
भेसळ केलेल्या या इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी नंदकुमार गोपाळे, संजीव गावडे, सुधीर जाधव, हाक्के, पवार, देवरुखकर यांनी वांद्रे रिक्‍लमेशन परिसरातून अजय नासा या केमिस्टला अटक केली. अजय हा मूळचा दिल्लीचा रहिवासी असून त्याचे स्वत:चे केमिस्ट दुकान आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा इंजेक्शनचा साठा जप्त केला. जप्त केलेले इंजेक्शन स्वित्झर्लंड कंपनीकडून भारतात आयात केले जात असून रोश प्रोडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दिल्लीतून ते बोगस इंजेक्शन काही दिवसांपूर्वी मुंबईत पाठविण्यात आले होते. जुलै 2020 रोजी त्याने गुडगाव येथून काळ्या बाजारात 58 हजार रुपयांचे इंजेक्शन विकत घेतले होते. इंजेक्शन पॅकिंगसाठी वापरलेले हुबेहूब दिसणारे बॉक्स आणि लेबर उत्तराचल येथून प्रिंट करून आणले.
मूळ इंजेक्शन ज्या बॉटलमध्ये पॅक करतात तशा बॉटल विकत घेऊन त्यात डॅक्सोना आणि डेरिफिलन हे अस्थमासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन आणि डिस्टील वॉटरचा वापर करून कोरोनावरील इंजेक्शन म्हणून त्या औषधांची विक्री सुरू केली होती. अशा प्रकारे तो बनावट इंजेक्शनची विक्री करीत होता. एक इंजेक्शनची विक्री तो एक लाख रुपयांमध्ये करीत होता. यापूर्वी याच गुन्ह्यात आझम नजीर खान या व्यक्‍तीला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी काही इंजेक्शनचा साठा जप्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here