अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्या दुचाकींचा पोलिसांनी कसून शोध घेऊन तीन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांचेकडून दोन दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.दुचाकी चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली चहार्डी (ता.चोपडा) येथील कृष्णदास तुकाराम महाजन यांचे चहार्डी शिवारातील शेताच्या शेजारी असलेल्या पाटचारीवर उभी केलेली मोटर सायकल क्रमांक एमएच १९ सीएच ३८०९ ही काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लॅटीना गाडी दि.१६ ऑगस्ट रोजी चोरीस गेली होती.याबाबत कृष्णदास महाजन यांनी शहर पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीची फिर्याद दिली होती.तसेच ज्ञानेश्वर मच्छिन्द्र पाटील रा.चहार्डी ह.मु.चोपडा यांची अकुलखेडा शिवारातील शेताच्या रस्त्यावर उभी केलेली मोटर सायकल क्रमांक-एमएच १९ डीजे ९६५६ ही लाल रंगाची बजाज कंपनीची प्लॅटीना गाडी दि.१९ सप्टेंबर रोजी चोरीस गेली होती.याबाबत ज्ञानेश्वर पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीची फिर्याद दिली होती.
मोटर सायकल चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर,पो.ना.मधुकर पवार,पो.ना.संतोष, पारधी,पो.ना.ज्ञानेश्वर जवागे,पो.ना.प्रदीप राजपूत, पो.कॉ.योगेश शिंदे,पो.कॉ. नितीन कापडणे यांनी तपासाची चक्रे फिरवत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राजेश्वर उर्फ राजेश गोरख भिल (वय-२८),शरद भाऊराव भिल (वय-२९) दोन्ही रा.चहार्डी (ता.चोपडा) या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.
तपासात दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी चहार्डी येथील दोन्ही मोटर सायकली चोरी केली असून,त्यापैकी काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना गाडी गुलाब हिंमत कोळी (वय-३२) रा.मांडळ (ता.अमळनेर) यांना तर लाल रंगाची बजाज प्लॅटीना गाडी पारोळा येथे विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून गुलाब हिंमत कोळी रा.मांडळ (ता.अमळनेर) याचे कडून काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना गाडी पोलिसांनी जप्त केली तसेच दुसरी लाल रंगाची विक्री बजाज प्लॅटीना गाडी देखील पारोळा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.
याबाबत राजेश्वर उर्फ राजेश गोरख भिल (वय-२८),शरद भाऊराव भिल (वय-२९) दोन्ही रा.चहार्डी (ता.चोपडा),गुलाब हिंमत कोळी रा. मांडळ (ता.अमळनेर) यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भाग-५ गुरनं.११५ व १२४ भादवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,तिघां आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मधुकर पवार करीत आहेत.







