मुंबई (गणेश तळेकर) – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार असून त्याविषयीची घोषणा केली सोशल मीडियावर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काजलच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत्या. सोशल मीडियावर पोस्ट लिहित काजलने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
‘मी हो म्हणाले. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्नगाठ बांधत आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं प्रेम आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद’, असं काजलने लिहिलं. लग्नानंतर काजल चित्रपटसृष्टीत काम करणार का या प्रश्नाचंही उत्तर तिने या पोस्टमध्ये दिलं. लग्नानंतरही मनोरंजनसृष्टीत काम करत राहणार असल्याचं तिने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलं.
काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती आणि काजलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.







