ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ९.१०.२०२० रोजी पहाटेच्या वेळेस अन्न व औषध प्रशासनाचा दक्षता विभाग व अंमलीपदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांनी संयुक्त कारवाईमध्ये ओयो सिल्व्हर की हॉटेल, एमआयडीसी, महापे या हॉटेल समोर आयशर वाहन क्र. MH-14 FT 4100 , महिंद्रा पिक अप वाहन क्र.MH-43 BB 1856 व इको व्हॅन वाहन क्र. MH-43 AR 7601 या तीन वाहनावर छापा टाकून विमल पान मसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखू या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांचा रु. ३५, ५३,३१२/- किंमतीचा साठा जप्त केला.
वाहनांसोबत असलेल्या जितेंद्र दास, अखाया खंडा, प्रियव्रत दास, मुन्ना श्री. जनार्दन यादव या व्यक्तींना पकडण्यात आले. सदर सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री ना. राजेंद्र येड्रावकर व मा. आयुक्त श्री. अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त (दक्षता) श्री. सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री. एम.आर. घोसलवाड, श्री. डी.एस.महाले , श्री.व्ही.एच.चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली. प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या गोदामाबाबत अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास त्याची माहिती टोल फ्री क्र.१८००२२२३६५ वर अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त (दक्षता) श्री. सुनील भारद्वाज यांनी जनतेला केले आहे.








