मुंबई (गणेश तळेकर) – मुंबईमध्ये सोमवारी(१२ ऑक्टोबर) पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु केली. अनेक सेलिब्रिटींनीदेखील यावर भाष्य केलं. त्यातच अभिनेता अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्विट केलं असून नागरिकांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे.
“सध्या संपूर्ण शहरामध्ये ही समस्या आहे. मीदेखील थोडं मॅनेज करुन हा मेसेज केला आहे. संयम बाळगा, सगळं ठीक होईल”,असं ट्विट त्यांनी केलं आहे.सोबतच त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. “डोंगल व्यवस्थित काम करत आहे आणि व्होडाफोनदेखील सुरळीतपणे सुरु आहे”, असं ते दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. त्यांचं ट्विट पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता, तो आता पूर्ववत झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत होते. बेस्टनं यासंदर्भातील ट्विटरवरुन माहिती दिली होती. टाटाकडून करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं होतं.







