– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)
‘द लेडी इन व्हाइट’ म्हणून तसेच आपल्या सिनेवाटचालीत बोल्ड भूमिकांनी गाजलेली अभिनेत्री सिमी गरेवाल यांचा आज 17 ऑक्टोबर वाढदिवस.
दो बंधन, साथी, मेरा नाम जोकर, सिध्दार्थ यातील आपल्या भूमिका आणि या चित्रपटातून दिलेल्या दृश्यामुळे त्या गाजल्या होत्या तसेच कर्ज ह्या सुपरहिट चित्रपटातील नकारात्मक भूमिकेमुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
सिमी गरेवाल यांचा 17 ऑक्टोबर 1947 रोजी दिल्ली येथे जन्म झाला. सिमीचे वडील जे.एस.गरेवाल आर्मीमध्ये ब्रिगेडियर पदावर होते. सिमीचे प्राथमिक शिक्षण त्यांची बहीण अमृता सोबत इंग्लडमध्ये न्यू लैंड हाऊस स्कूलमध्ये झाले. 1980 च्या दशकात पाकिस्तानी बिजनेसमॅन सलमान तासीर यांच्याशी चाललेले अफेयर खूप गाजले. सलमान तासीर नंतर पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गव्हर्नर झाले. सिमीचा विवाह रवि मोहन यांच्याशी झाला पण अल्पावधीतच दोघांनी घटस्फोट घेतला.
इंग्लडमध्ये बालपण गेल्यानंतर परिवाराने त्यांना भारतात बोलावले. इंग्लिश सहजतेने बोलत असल्याने सिमीला ‘टार्जन गोज टू इंडिया’ या चित्रपटात भूमिका मिळाली. त्यावेळी ती केवळ 15 वर्षांची होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील सिमी गरेवालचे पहिले पाऊल पडले ते फिरोज खानसोबत 1962 मध्ये. या चित्रपटामुळे त्यांना 60 – 70 च्या दशकात अनेक चित्रपटांच्या ऑफर चालून आल्या. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे सिमी गरेवाल यांना काम करण्यासाठी बोलाविणारे दिग्दर्शक तेवढेच महत्वाचे होते. राजकपूर, सत्यजीत रे, मृणाल सेन, राज खोसला या दिग्दर्शकांनी त्यांना बोलावले. सिध्दार्थ या चित्रपटात सिमी गरेवाल यांनी शशि कपूरसोबत काम केले. या चित्रपटातील हाफ न्यूड सिनमुळे कंट्रोवर्सीमध्ये सापडलेला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही.
1970 मध्ये त्यांनी कभी कभी या चित्रपटात काम केले. याव्यतिरिक्त चलते चलते हा चित्रपट व कर्ज या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेमुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
1980 च्या सुरुवातीला अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन सुरु केले. स्वतःची सिगा आर्ट इंटरनॅशनल ही प्रोडक्शन कंपनी सुरु केली. या कंपनीद्वारे त्यांनी इट्स वूमन वर्ल्ड या दूरचित्रवाणी मालिकेचे निर्मिती, दिग्दर्शन व लेखन केले. युके चा चॅनल 4 करिता 1984 मध्ये लिविंग लिजेंड राजकपूर तसेच इंडियाज राजीव या तीन भागाच्या माहितीपटांची निर्मिती केली. या व्यतिरिक्त रुखसत ह्या हिंदी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले. काही जाहिरातींचे निर्मिती केली. वैशिष्टपूर्ण जाहिरातींकरिता त्यांना 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून फर्स्ट पीटर्स अॅवार्डदेखील मिळाले आहे.
स्टार प्लसवरील टॉक शो इंडियाज मोस्ट डिजायरेबल हा त्या होस्ट करीत असत. यामध्ये चित्रपटसृष्टी, बिझनेस जगत, क्रिकेटर्स आणि मिडीयातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
अशा या बहुआयामी अभिनेत्रीस वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!







