पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – वाळू सप्लायर मयूर हांडे याच्यावर गोळीबार करण्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, राजेश भिकू पडवळ (वय २५, रागोजहे, ता. हवेली) आणि बाळासाहेब अनंत जाधव (वय ५२, रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत गोळीबार प्रकरणात अनैतिक संबंधाचे धागेदोरे असल्याचे देखील समोर आले आहे.
याबाबात पोलिसांनी सांगितले की, महंमदवाडी येथे १२ ऑक्टोबर रोजी मयुर हांडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली त्यामुळे ते बचावले. या घटनेचा वानवडी पोलिसांनी ४८ तासात तपास करुन गोळीबाराचा गुन्हा उघडकीस आणला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील म्हणाले, यातील फिर्यादी मयुर हांडे याचा ट्रक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ते ट्रक्टर घेऊन महंमदवाडी येथे गेले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. राजेश पडवळ याने गोळीबार करुन हांडे यांना मारण्याची ३० लाख रुपयांची सुपारी घेतली होती.
पडवळ हा इलेक्ट्रीशन आहे. त्याच्यावर दहा लाखाचे कर्ज असल्याचे समजते. त्याला पैशाची गरज होती. त्यातूनच त्याने खुनाची सुपारी घेतली होती. तर बाळासाहेब जाधव हे व्यावसायिक असून हांडे याच्या वर्तनाचा जाधव यांना त्रास होत असल्यानेच त्यांनी पडवळला सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.







