नंदुरबार (प्रतिनिधी विजय पाटील) – येथील जिजामाता फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांच्या आत्महत्येप्रकरणी 10 जणांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 3 जणाना अटक करण्यात आली आहे.
येथील जिजामाता फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र शाम चौधरी (56) यांनी महाविद्यालयाच्या वर्गखोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल घडली. याबाबत तुषार कुलकर्णी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, रात्री उशिरा 10 जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य चौधरी यानी त्यांच्या मुलीच्या एम.बी.बी.एस. च्या प्रवेशासाठी डॉ.नवलकिशोर शिंदे (चांदवड), सुभाष राठोड़, तांबे सर (दोन्ही रा.नाशिक) याना 22 लाख रुपये दिले होते. परंतु प्रवेश झाला नाही. सचिन अतारकार, सौरभ श्रीवास्तव, शंकर मानवतार (तिन्ही रा.मुंबई) याना 20 लाख रुपये दिले होते. सुनिल महाजन (शहापूर) यांच्याशी केळीमधे भागिदारी केली होती. रविंद्र साळुंखे, कविता साळुंखे (रा. नंदुरबार) याना 10 लाख उसनवार दिले होते.
मुकेश वसईकर याला मैडिकल स्टोरसाठी तसेच अनिल रनछोड चौधरी यालाही उसनवार पैसे दिले होते. परंतु प्राचार्य चौधरी याना पैसे परत मिळत नव्हते म्हणून त्यानी आत्महत्या केली अशी फिर्याद कौस्तुभ रविंद्र चौधरी यानी उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानूसार वरिल 10 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनिल चौधरी, मुकेश वाडेकर, रविंद्र साळुंखे याना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.







