उत्तर प्रदेशात घरात घुसून २२ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

up-gang-rape

कानपूर (उत्तरप्रदेश) – स्त्रीशक्तीच्या पूजनाचा उत्सव नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरदेखील महिलांवरील अत्याचारात घट झाल्याचे दिसून येत नाही. उत्तर प्रदेशात तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कानपूरमधील देहातमध्ये रविवारी रात्री उशिरा एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याचे उघड झाले आहे. गावातील दोन तरुणांनी घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून देहात पोलिसांत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पथकाची स्थापना केली आहे.

 

 



कानपूर देहातमधील डेरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमौली येथील २२ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ८ ऑक्टोबरला रात्री १० वाजताच्या सुमारास गावातील दिनेश आणि उमेश त्यांच्या घरात घुसले. त्यांना प्रतिकार केला असता, शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी बलात्कार केला. तसेच जातीवरून शिवीगाळ केली. याबाबत कुठेही वाच्यता केली तर, जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

 

 



धमकावल्यानंतर दोघेही तरूण निघून गेले. पीडितेने घडलेल्या घटनेची माहिती आईवडिलांना दिली. त्यानंतर पीडितेसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. कानपूर देहातचे पोलीस अधीक्षक केशव कुमार चौधरी यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, मारहाण आणि अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक स्थापन केले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here