नाथाभाऊंच्या शुक्रवारच्या राष्ट्रवादी प्रवेशाची
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – एकनाथराव खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. आज (दि.२१) एकनाथराव खडसे यांनी रितसर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देवून भाजपाला रामराम ठोकला आहे.
खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी केली. येत्या शुक्रवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. खडसे यांनी प्रवेश केल्यामुळे भाजपने उत्तर महाराष्ट्रातील खंदा नेता गमावला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाल्याचे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता.२०) केलेल्या भाषणावर टीका केली. त्यांच्या या ट्विटला रिट्विट करत एकनाथ खडसेंनी पाठिंबा दिला. जयंत पाटील यांनी ”आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असे वाटले होते. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! असा आरोप जयंत पाटील यांनी ट्विट करत केला.
विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे हे ट्विट आपल्या अधिकृत अकाऊंटवर रिट्विट करत मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. खडसेंच्या या भूमिकेमुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चितच झाले होते. मात्र त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचे दिसून आले. त्यानंतर माधव भंडारी यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करणारे व पोलिस स्मृती दिनानिमित्त अभिवादन करणारे ट्विट केले. त्या ट्विटवर पुन्हा कमळ दिसून आले. त्यामुळे त्यांच्या मनात आहे तरी काय अशी विचारणा सुरु झाली. मात्र आता जयंत पाटील यांनी घोषणा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.







