माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे भाष्य
- दक्षिण महाराष्ट्रातही भाजपातील नाराजी बाहेर
- मी भाजपातच राहणार – खा.रक्षाताई खडसे
- पक्ष विचारांवर आणि तत्वांवर चालतो – माजी मंत्री गिरीश महाजन
मुंबई / कोल्हापूर (उपसंपादक दिलीप दळवी / प्रतिनिधी नियाज जमादार) – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे नमूद करत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खास शैलीत भाजपाला झोंबणारे भाष्य केले आहे.
एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे भाजपमधून खडसेंचा निर्णय ‘धक्कादायक’, ‘दुर्दैवी’, ‘चुकीचा’ अशा प्रतिक्रिया येत असताना महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारमधील एक मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अगदी नेमकी आणि भाजपला झोंबणारी प्रतिक्रिया दिली आहे.
नाथाभाऊंच्या निर्णयाचे मला दुःख, तरीही भाजपात राहणार – खा.रक्षाताई खडसे
‘नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. पण, मी भाजपकडून निवडून आले आहे आणि यापुढेही भाजपतच काम करत राहणार आहे’, अशी प्रतिक्रिया नाथाभाऊंची सून असलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.
‘भाजपने नाथाभाऊंना भरपूर काही दिले आहे, हे त्यांनीसुद्धा नमूद केले आहे. सर्वजण पक्षामुळेच मोठे होत असतात. पण नाथाभाऊंचेही योगदान पक्षवाढीसाठी होते, हे नाकारता येत नाही. त्यांनी ४० वर्षे पक्षासाठी दिली आहेत. त्यांच्यामुळे राज्यात पक्ष मोठा झाला, हे मान्यच करावे लागेल. मी सांगितले तसेच झाले पाहिजे, असा आग्रह नाथाभाऊंचा कधी नव्हता. त्यांनी माझ्यावर कधीही दबाव टाकला नाही. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे मीही राजीनामा दिला पाहिजे, असे काही नाही’, असेही रक्षाताई खडसेंनी नमूद केले.
पक्ष विचारांवर आणि तत्वांवर चालतो – माजी मंत्री गिरीश महाजन
माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा भाजप सोडण्याचा निर्णय निश्चितच दुर्दैवी आहे. त्यामुळे पक्षाला नुकसान तर होणार आहेच; पण ते क्षणिक आहे. शेवटी पक्ष हा विचारांवर आणि तत्वांवर चालतो, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यात भाजपचे दुसरे मोठे नेते आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. एकनाथराव खडसे यांचे भाजप वाढीसाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आणि मी सोबत काम केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपसाठी काम केले होते. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु, त्यांनी घेतलेला भाजप सोडण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे भाजपला निश्चितच नुकसान सहन करावे लागेल. पण ते नुकसान क्षणिक असणार आहे, असे महाजन पुढे म्हणाले. भाजप हा काँग्रेस, शिवसेनेप्रमाणे घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही की ज्या ठिकाणी गांधी गेले, बाळासाहेब ठाकरे गेले, आता पुढे काय? असा प्रश्न उद्धवतो. भाजप खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. याठिकाणी अनेकजण पक्षात आले, मोठे झाले आणि गेलेही. परंतु, पक्ष वाढतच राहिला. या पक्षात चहा विकणारा सर्वसामान्य माणूस देखील देशाच्या पंतप्रधानपदी जाऊ शकतो, ही भाजपची ताकद आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
खडसे ज्या पक्षात जातील, तेथे चांगले काम करावे – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
‘एकनाथराव खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत,’ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी खडसेंच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
पाटील म्हणाले, खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत नव्हते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील, तेथे त्यांनी चांगले काम करावे,’ अशा शुभेच्छा पाटील यांनी दिल्या.
खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही – माजी मंत्री प्रा.राम शिंदे
माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी खडसेंच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देतांना म्हणाले, ‘भाजपमध्ये खडसे यांना जी किंमत होती, ती राष्ट्रवादी त्यांना कधीही मिळणार नाही. खडसे यांच्यासोबत जे लोक जात आहे, अशी जी काही वलगणे सांगितली जात आहेत, पण मला वाटतं त्यांच्यासोबत लोकमतातील कोणताही प्रचलित नेता जाणार नाही. कोणीही एवढे धैर्य दाखवणार नाही. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विस्तार होताना दिसतोय,म्हणून आता खडसे यांनी राष्ट्रवादीत जाण्याची जी हिंमत केली, त्यांचा आगामी काळात त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.’
दक्षिण महाराष्ट्रातही भाजपातील नाराजी बाहेर
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्षातील असंतोषाला वाट मोकळी करून दिल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील पक्षातील वादाची चर्चा सुरू झाली आहे. मुळात हा भाग काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांच्या हातात कमळ देत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळात कमळ फुलवला. आयात नेत्यांना मोक्याची आणि मोलाची पदे दिली. त्यांचा वापर करत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली. पण नंतर पदे कमी आणि आश्वासने जास्त अशी अवस्था झाल्याने अनेकजण नाराज झाले आहेत. काही प्रकरणात निष्ठावंतांना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली. यातूनच पक्षात खदखद वाढली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यात ही खदखद असून ती व्यक्त करण्यासाठी अनेकांना कोणत्यातरी निवडणुकीची प्रतिक्षा लागली आहे.
कोल्हापुरात जिल्हाध्यक्षपद न मिळाल्याने सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, संपतराव पवार, सुरेश जरग असे काहीजण नाराज आहेत. त्यांच्यासह अनेकांनी इतर पक्षात जाण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे अनेक कार्यकर्ते शिवसेना अथवा काँग्रेसचा झेंडा हातात घेण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात खासदार विरोधात आमदार हे चित्र सतत पहायाला मिळत आहे. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर हे तीनही आमदार खासदार संजय पाटील यांना पाण्यात बघतात. पक्षातील या वादाचा फटका विधानसभेला बसला. विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक यांना यामुळे पराभूत व्हावे लागले. पक्षातील असंतोषाला महापालिकेत तोंड फुटले आहे. बहुमत असतानाही स्थायी समिती सभापती निवडणुकीत पक्षाला विजयासाठी प्रचंड झगडावे लागले. बाजार समितीच्या अनेक संचालकांनी भाजपला रामराम करत हातात ‘घड्याळ’ बांधले. ही सुरुवात आहे. अजूनही अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ते फक्त संधीच्या शोधात आहेत







