नंदुरबार (विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अंबापुर येथे पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाड्यांना पूरक पोषण आहार पुरवठा करण्यात येतो येथील अंगणवाडी क्र.4 ची अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांनी पोषण आहार योजनेत घोटाळा करून भ्रष्टाचार केला असून या योजनेतील निधीची अफरातफर करून त्याचा गैरवापर केला आहे असा आरोप करण्यात आला आहे . शालेय पोषण आहार योजना व डॉक्टर अब्दुल कलाम गरोदर माता व स्तनदा योजनेच्या माध्यमातून पोषण आहाराचे दरमहा वाटप केले जाते परंतु सदर पोषण आहार वाटपात अनियमितता आढळून आली आहे.
अंगणवाडी सेविका पार्वती नारद पावरा यांनी डॉ.अब्दुल कलाम गरोदर माता व स्तनदा योजनेतील बँक खात्यातील शासकीय निधी पूर्णपणे काढून तिच्या खासगी व घराच्या कामासाठी वापर करून घेत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी संजय गुलाब मोरे व संग्रामसिंह गुलाब खर्डे यांनी तक्रार दिली असून प्रशासन मात्र चौकशी न करता अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांना पाठीशी घालत आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.सदर प्रकरणाच्या चौकशी संदर्भात प्रशासनाला विचारणा केली असता चौकशी सुरू असून ज्या लाभार्थ्यांना पोषण आहार धान्य वाटप कमी झाले होते त्यांना पूर्ववत देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे असे स्पष्ट केले.
शासनाकडून पुरवण्यात येणारा पूरक पोषण आहार हा लाभार्थ्यांपर्यंत पूर्णतः पोहचत नसून त्यात कमतरता आढळून आली आहे असे स्पष्ट होते परंतु याबाबत प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही यासंदर्भात किती तक्रारी केल्या तरी प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे तरी या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे.







