छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला छतावरून फेकले

vinaybhang

उत्तर प्रदेश (सुलतानपूर ब्युरो चीफ सय्यद एजाज अहमद) – उत्तर प्रदेश सरकारने नवरात्रौत्सव काळात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘मिशन शक्ती अभियान’ हाती घेतले आहे. मात्र, रोडरोमिओ मोकाटच आहेत. मऊ जिल्ह्यात शनिवारी छेडछाडीला विरोध केल्यानंतर तरुणांनी एका तरुणीला छतावरून खाली फेकले. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

मोहंमदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. परत येताना परिसरातील चार ते पाच तरुणांनी तिचे तोंड दाबले आणि घराच्या छतावर घेऊन गेले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक जमा झाल्याने तरुणांनी तिला छतावरून खाली फेकून दिले. त्यानंतर तरूण फरार झाले.

 

यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. आझमगढच्या एका रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, परिसरातील चार ते पाच तरुणांनी मुलीची छेड काढली. मुलीने बचावासाठी आरडाओरड केल्यानंतर तिला छतावरून फेकले. मऊचे पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here