महाराजस्व अभियान सर्वसामान्यांसाठी वरदान- पालकमंत्री गुलाबराव पाटील

maharajasva
  • अभियानाची फलश्रुती म्हणून १ हजार व्यक्तींना मिळाला लाभ
  • उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच कार्यक्रम; समाधान शिबिरात लाभार्थी समाधानी !

धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – महाराजस्व अभियान हे सर्वसामान्यांसाठी वरदान असून उत्तर महाराष्ट्रात प्रथमच विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर याच प्रकारे अभियान राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाळधी येथे आज आयोजित महाराजस्व अभियानाच्या विस्तारीत समाधान योजतेंतर्गत आयोजित समाधान शिबिराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

पाळधी येथे महाराजस्व अभियान विस्तारीत समाधान योजनेंतर्गत विविध योजनांची माहिती व दाखले व साहित्य वाटप कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, सरपंच प्रकाश पाटील, चंदू माळी, अनिल कासट, चंदन कळमकर, सचिन पवार, आदी उपस्थित होते.

 

प्रास्ताविकात प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी महसूल विभाग अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान बाबत महत्त्व विशद केले . जिल्ह्यात व्यापक प्रमाणात सदर अभियान महसूल व पंचायत समिती मार्फत राबवून गरजुपर्यंत योजना पोहचविण्याचे काम रात्रंदिवस केले जात असल्याचे सांगितले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लोककल्याणाचे काम करण्यात येत असल्याचे प्रतिपादन केले. कोरोनाच्या कालखंडात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांनी रूग्णांची संख्या कमी झाली असून रिकव्हरी दर देखील वाढला असल्याचे ते म्हणाले.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आजच्या समाधान शिबिराच्याच दिवशी आपल्या विधानसभा विजयाला एक वर्ष पूर्ण होत असल्याचा योगायोग नमूद केला. ते म्हणाले की, या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे शासनाला अनेक महत्वाच्या योजनांना निधीची कमतरता असली तरी शासनाने जनहिताचे काम सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब- माझी जबाबदारी या व्यापक मोहिमेमुळे कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी आपण सर्वांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर पाळधी येथील कार्यक्रमाप्रमाणे प्रत्येक तालुक्यावर शिबिरे घेण्यात यावीत असे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

 

फलश्रुती राजस्व अभियानाची
महाराजस्व अभियान अंतर्गत पाळधी येथे आयोजित समाधान शिबिरात एकूण १० स्टॉल लावण्यात आले होते. यात पुरवठा, संजय गांधी निराधार योजना , कृषी , आरोग्य , विमा लाभ , आधार नोंदणी , सीएससी केंद्र , पंचायत समिती विभाग, रक्तदान शिबिर, वर्ल्ड व्हिजन इंडिया , असे विविध स्टॉल लावण्यात आले होते . यात आत्महत्या केलेल्या 5 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उभारी योजनेअंतर्गत खते बियाणे औषधांचे किट वाटप, पालकमंत्री शिव / पाणंद रस्ते अंतर्गत तालुक्यातील ८ किलोमीटरचे अतिक्रमित शिव रस्ते मोकळे करुन मुरुमीकरण करण्यात आले. तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात १५५ गटई स्टॉल मंजूर करण्यात आले असून त्यात धरणगाव तालुक्यात २३ गटई स्टॉल वाटप करण्यात आले.

 

राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत तालुक्यातील २८ महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे असे ५ लक्ष ६० हजाराचे चेक वाटप करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत तालुक्यातील ४ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी १ लक्ष १८ हजार ७४० रुपयांचा धनादेश देण्यात आला. तालुक्यातील शौचालय बांधकामासाठी ११२ लाभार्थी लाभार्थ्यांना १३ लाख ४४ हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत १६१ कुटुंबांना प्रमाणपत्र व रोजगार हमी योजनेअंतर्गत ४७१ जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. २१३ उत्पन्न दाखले , १२० डोमासाईल सर्टिफिकेट, ५२ नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट, ७७ जातीचे दाखले, आणि ०५ ईडब्ल्यूएस सर्टीफिकेट वाटप करण्यात आले. तसेच याठिकाणी २१ व्यक्तींची र्लेींळव-१९ ची तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिर देखील या महाराजस्व अभियान राबवले गेले. यात २४ व्यक्तींनी रक्तदान केले असून त्यांना पालकमंत्री व रेडक्रॉस सोसायटी यांच्या मार्फत प्रत्येकी १ वर्षाचा १ लाखाचा विमा संरक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. महसूल विभागामार्फत प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यात फेरफार अदालत घेऊन सुमारे १५० फेरफार करून नोंदी मंजूर करण्यात आलेले आहेत. वराड बु, आव्हानी, बोरखेडा, हनुमंतखेडे, पष्टाने , पाळधी, पिंप्री अशा ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात येऊन माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली.

 

वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत अनुदान वाटप
सर्वात महत्वाचे म्हणजे वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात तालुक्यातील कोरोनाग्रस्त १० व्यक्तींना घरपोच प्रत्येकी ०५ हजार रुपयेचे चेक देण्यात आले. ३ हजार कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून १ हजार रुपयांचा चेक व १ हजार रुपयांचे धान्य देण्यात आले. १२० महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या बकरी वाटप करण्यात आल्या. तालुक्यातील हजारो कुटुंबांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले तर आभार तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here