पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – नगर महामार्गावर रामवाडीजवळ एका वाइन शॉपचे दुकान फोडून एक लाख ८० हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश पुरुषोत्तमदास मोजवाणी (वय ४८, रा. साधू वासवानी चौक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे-नगर महामार्गावर रामवाडीनजीक फिर्यादी यांचे एन. एम. वाइन्स नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून फिर्यादी घरी निघून गेले. सोमवारी पहाटे चार वाजण्याचा सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी जाळीचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी एक लाख ८० हजार रुपये ठेवलेली दुकानातील लोखंडी तिजोरी घेऊन पळ काढला. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाली असून, त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.







