ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दोन दिवसांपूर्वी अंधेरी परिसरात मालवी सुशील मल्होत्रा या अभिनेत्रीवर चाकूने हल्ला करुन पळून गेलेला योगेशकुमार महिपाल सिंग हा कथित निर्माता आरोपी अखेर वसईत सापडला. मात्र हल्ल्यानंतर वसई येथे कारमधून जाताना त्याचा अपघात झाल्याने त्याला प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाल्यांनतर त्याला हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. मालवी अंधेरी परिसरात राहत असून तिच्यावर योगेशकुमार हा एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने तिला तो निर्माता असल्याचे सांगून लग्नाची मागणी घातली होती, मात्र वारंवार नकार देऊनही तो तिचा सतत पाठलाग करीत असे. सोमवारी रात्री तो अंधेरी येथे आला आणि पुन्हा तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तिने पुन्हा त्याला नकार देताच रागाच्या भरात त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला होता. गंभीर जखमी मालवीला अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यानंतर योगेशकुमार हा त्याच्या कारमधून पळून गेला होता. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी योगेशकुमारविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता, गुन्हा दाखल होताच त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला होता, याच दरम्यान तो पोलिसांना वसईत सापडला.







