सोलापूर (प्रतिनिधी) – उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाबळगाव तलावाजवळ पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेत असलेल्या या बाळाला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाबळगाव तलावाजवळ बुधवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान टोल नाका परिसरात हा प्रकार घडला. पेट्रोलिंग करत असताना वाहनचालक बालाजी हिप्परगे यांना एका पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी पिशवी उघडून पाहिले असता, नवजात बाळ आढळून आले. त्यानंतर बालाजी हिप्परगे यांनी तात्काळ नळदुर्ग पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.
नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळ ताब्यात घेतले. घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील बाळ हे जखमी अवस्थेत होते. भुकेने रडत असल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी यांनी स्वत:चे दूध पाजले.
रडणारे बाळ पाहून मन हेलावले म्हणून महिला कर्मचाऱ्याने स्वत:चे दूध पाजून मातृत्व धर्म निभावला असल्याने त्यांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील बाळ जखमी असल्यामुळे उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. हे बाळ कुणी आणि का टाकले याचा तपास पोलीस करत आहेत.







