नवजात अर्भकाला खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न

आंबोडी गावातील एक विचित्र आणि मनाला सुन्न करणारी घटना

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंडे) – पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील आंबोडी गावातील मानवतेला काळीमा फासणारी घटना: आज दिनांक 28 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती; तीन दिवसापूर्वी जन्मलेल्या एका नवजात बालकास शेतामध्ये खड्डा काढून- कुणालाही थांगपत्ता लागणार नाही अश्या पद्धतीने गडबडीत खड्ड्यामध्ये पुरून पसार झाले. हा सगळा विचित्र प्रकार तेथे असलेल्या एका इसमाने (गावकऱ्यांने) पाहिला. घटनास्थळी लगेच धाव घेऊन बालकाच्या गुदमरलेल्या अवस्थेतील रडण्याच्या आवाजामुळे त्याला घडलेल्या प्रकाराची समज आली. क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या बालकास खड्ड्यातील माती बाजूला करून बाहेर काढले आणि गुदमरलेल्या अवस्थेतील बालकाला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

 

घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालय जेजुरीचे 108 चे डॉक्टर प्रफुल्ल प्रमोद काकडे आणि ड्रायव्हर प्रशांत वाल्हेकर हे तूर्त घटनास्थळी पोहोचले. घटना वाऱ्यासारखी आंबोडी गावांमध्ये पसरली. सासवड पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि डॉक्टर प्रफुल्ल काकडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून नवजात बालकास ताब्यात घेऊन प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे भरती केले. प्राथमिक उपचार करून (बालकाची शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासून त्याला स्वच्छ केले) बालक सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. पुढील उपचाराकरिता त्या नवजात बालकास डॉक्टर प्रफुल्ल काकडे यांनी सासवड पोलिसांच्या मदतीने त्या नवजात बालकास ससून जनरल हॉस्पिटल-पुणे येथे सुखरूप पोहोच केले.

 

घटना खरोखरच मनाला हेलावणारी आहे. गावकऱ्यांचे प्रसंगावधान डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाने जलद गतीने घेतलेले निर्णय आज एका नवजात बालकास पुन:आयुष्य देण्यासाठी उपयोगी ठरले. गावकरी, पोलीस प्रशासन आणि डॉक्टर यांचे करावे तेवढे कौतुक कमीच. डॉक्टर
गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला घडलेल्या प्रकाराची कसून चौकशी करण्यासाठी विनंती केली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला.

 

https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/667631477287788/?t=1

 

 

पुण्यातही कंचराकुंडीत आढळले नवजात अर्भक

दरम्यान, बुधवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात नुकतंच जन्मलेलं नवजात अर्भक एका निर्दयी मातेनं कचराकुंडीत फेकून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. शहरातील तापकीर मळा परिसरात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते सफाई करत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी नितीन सुर्यवंशी नामक व्यक्तीने या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यानं कचराकुंडीत बघितलं असता त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.

 

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात अर्भक जीवाचा आकांत करत हंबरडा फोडत होतं. निर्दयी मातेनं या नवजात स्त्री जातीचं अर्भक फेकून दिलं होतं. अर्भकावर एकही कपडा नव्हता. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलीची नाळ ठेचून तोडण्यात आल्यामुळे होणाऱ्या वेदनांनी पहाटेच्या थंडीत अर्भक अक्षरशः विव्हळत असल्याचं नितीन सुर्यवंशी यांनी बघितलं. ही बाब त्यांनी तत्काळ स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना कळवून मुलीला सुरक्षितरीत्या पोलिसांच्या स्वाधीन केलं.
सध्या या चिमुकलीवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here