अहमदाबाद – गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे केशुभाई पटेल यांचं गुरुवारी निधन झालं.केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भुषवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते.
92 वर्षीय केशुभाई यांनी 6 वर्षांपूर्वी 2014 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. केशुभाई यांचा जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्येही समावेश होतो. दोन वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र राजकारणामुळे तख्तपालट होऊन दोन्ही वेळेला आपला कार्यकाळ त्यांना पूर्ण करता आला नाही. २००१ साली त्यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केशुभाई यांना नरेंद्र मोदी आपला राजकीय गुरू मानत होते.
१९७७ साली केशुभाई पटल राजकोटमधून लोकसभेचे खासदार बनले होते. त्यानंतर मात्र त्यांनी राजीनामा दिला आणि बाबूभाई पटेल यांच्या जनता मोर्चा सरकारमध्ये १९७८ ते १९८० पर्यंत कृषीमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.’राज्याची खरी कमान हे केशुभाईंच्या हातात आहे’, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर केलं होतं. यावेळी, त्यांनी केशुभाईंनी ‘रथाचे सारथी’ असंही म्हटलं होतं.
केशुभाई पटेल यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर ते कोरोनामधून ठणठणीत बरेही झाले होते. केशुभाई यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शोक व्यक्त केला आहे.
केशुभाई पटेल यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने खालावत चालली होती. गुरुवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही.







