धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे मित्र व स्वीय सहाय्यक हेमंत नारखेडे उर्फ बंडूदादा हे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या कालखंडात सेवेची वाट धरलेल्या या आमच्या बंडू दादांना स्नेह्याचा पुढील प्रवास हा शिवबंधनाच्या माध्यमातून समाजसेवेचे असणार आहे. यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा !
हेमंत नारखेडे उर्फ बंडूदादा हे तसे मूळचे साळवा (ता. धरणगाव ) येथील रहिवासी. तथापि, त्यांचे वडील हे नोकरीनिमित्त पाळधी येथे १९५२ पासून स्थायिक झाले होते. यामुळे नारखेडे कुटुंब हे तेव्हापासून पाळधीकर झालेले आहे. बंडूदादांचे प्राथमिक शिक्षण हे पाळधी येथेच झाले. विशेष बाब म्हणजे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील हे त्यांचे वर्गमित्र होत. काळाच्या ओघात दोघांच्या वाटा भिन्न झाल्या. तरी नियतीने एका महत्वाच्या वळणावर या दोन्ही मित्रांना एकत्र आणले.
बंडूदादांनी झुलॉजी या विषयात बी.एस्सी. पूर्ण केल्यानंतर ते २६ जून १९८४ रोजी आरोग्य खात्यामध्ये रूजू झाले. तब्बल ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते आज निवृत्त होत आहेत. दरम्यानच्या कालखंडात त्यांनी विविध पदांवर आपल्या कार्यक्षमतेची अमिट छाप उमटवली. २००८ ते २०१२ या कालावधीत ते जिल्ह्याचे सहाय्यक हिवताप अधिकारी होते. तर २०१३ पासून ते हिवताप अधिकारी म्हणून त्यांच्याकडे धुरा आली असून ती त्यांनी समर्थपणे पेलली आहे. २०१७ पासून ते राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.
अतिशय कर्तव्यदक्ष व तत्पर असणार्या बंडूदादांनी आजवर शासकीय सेवेच्या व्यतीरिक्त अनेक महत्वाची कामे केली आहेत. यात त्यांनी आरोग्य खात्यातील १३० कर्मचार्यांना कायम पणाचे फायदे मिळवून दिले. ते मलेरिया सर्व्हेलंन्स कर्मचारी को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन देखील होते. तर प्रयोगशाळा वैज्ञानिक आधिकारी या संघटनेचे राज्यस्तरीय समितीचे विभागीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांची कामगिरी ही लक्षणीय राहिलेली आहे.
सेवानिवृत्ती हा आयुष्यातील खरं तर, एक अल्पविरामच असतो. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुणीही आपल्या कारकिर्दीच्या दुसर्या इनिंगमध्येही जोरदार कामगिरी करू शकतो. आमचे बंडूदादा देखील आता दुसर्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. आयुष्यातील महत्वाच्या कालखंडात सेवेची वाट धरलेल्या या आमच्या बंडू दादांना स्नेह्याचा पुढील प्रवास हा शिवबंधनाच्या माध्यमातून समाजसेवेचे असणार आहे.







