मुंबई पोलिसांनी २४ तासांत आरोपींना केले गजाआड
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – आर्थिक वादातून अक्षय राजू देसाई या तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या झाल्याची घटना शुक्रवारी चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना २४ तासांत पोलिसांनी अटक केली. अमर सुशील सिंग, अजय धर्मालिंगम स्वामी, रमण गोविंदराज शेट्टी आणि विशाल बाळू जाधव ऊर्फ गोट्या अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता चंबूर येथील चेंबूर कॅम्प, नॅशनल सर्वोदय हायस्कूलसमोरील अॅब्रॉल हॉटेलजवळ घडली.
आदित्य देसाई हा चेंबूर परिसरात राहत असून मृत अक्षय हा त्याचा भाऊ आहे. शुक्रवारी ते दोघेही त्यांचा मित्र विकी शेजुळसोबत रस्त्यावरुन जात होते. यावेळी अॅब्रॉल हॉटेलजवळ चार तरुण त्यांचा परिचित गणेश लोकरे याला मारहाण करीत होते. गणेश हा त्यांचा परिचित असल्याने त्यांनी या भांडणात मध्यस्थी केली होती.
त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या चौघांनी या तिघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर अमर सिंगने त्याच्याकडील चाकूने अक्षय याच्यावर वार केले होते. छातीत गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध हत्येसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्या विशेष पथकाने अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक केली.







