अश्लील शिवीगाळ केल्याने विष घेऊन युवतीची आत्महत्या

sucide

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – तीन तरुणांनी केलेल्या विनयभंग आणि अश्लील शिवीगाळीचा प्रकार सहन न झाल्याने तणनाशक प्राशन करून युवतीने आत्महत्या केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. दरम्यान, यातील एका तरुणानेही घाबरून कीटकनाशक प्राशन केले असून, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

 

 

प्राजक्ता सुरेश बाऊचकर (वय 20, रा. नणुंद्रे) असे मृत युवतीचे नाव असून, अजित तानाजी पाटील, अक्षय गणपती चव्हाण आणि प्रदीप कृष्णात पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील अक्षय आणि प्रदीपला अटक केली असून, तणनाशक प्राशन केलेल्या अजितवर उपचार सुरू आहेत.

 

 

अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील हे तिघे प्राजक्ताला वारंवार त्रास देत होते. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी प्राजक्ता कोलोली-तेलवे मार्गावरून दुचाकीवरून नणुंद्रे गावी जात होती. यावेळी वाटेत अडवून या तिघांनी तिचा विनयभंग करून अश्लील शब्द वापरले. तसेच, तिच्या मोबाईलवर मेसेज पाठवले. हा प्रकार सहन न झाल्याने तिने सायंकाळी तणनाशक प्राशन केले. कुटुंबीयांनी तिला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, प्राजक्ताच्या मृत्यूचे वृत्त गावात समजताच, संतप्त जमावाने संशयितांच्या घरात घुसून नासधूस केल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलीस फौजफाटा तैनात करावा लागला. याप्रकरणी प्राजक्ताची आई वैशाली बाऊचकर यांनी पन्हाळा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी पन्हाळा पोलीस निरीक्षक ओमऋषी फडतारे यांनी अक्षय चव्हाण व प्रदीप पाटील या दोघांना अटक केली. यातील अजित पाटील यानेही घाबरून दोन दिवसांपूर्वी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here