नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांनी या भागातील शेतकर्यांना सधन केले आहे. कारखाना शेतकर्यांच्या हक्काचा असल्याने शेतकर्यांनी आपला ऊस कारखान्यालाच देवून सहकार्य करावे. यंदा ऊसाला प्रतिटन 2 हजार 365 रुपयाचा भाव देणार असून कर्मचार्यांना दिवाळी बोनस म्हणून 1 हजार 888 रुपये दिले जातील, असे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी सांगितले.
श्री.सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या 46 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.राजेश पाडवी, कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे राज्य सदस्य राजेंद्र गावीत, जि.प.सभापती जयश्री पाटील, कृऊबाचे सभापती सुनिल पाटील, पं.स सभापती बायजाबाई भील, माजी जि.प उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पं.स उपसभापती रविंद्र पाटील, खविसंचे सभापती राजाराम पाटील, व्हा.चेअरमन जगदीश पाटील, पालिकेचे गट नेते प्रा.मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, माजी पं.स.सभापती वांगीबाई पावरा, भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील आदी उपस्थित होते.
दीपक पाटील म्हणाले, मोठ्या संकटातून मात करीत कारखाना सुरळीत सुरु आहे. चांगल्या विचारांच्या जोरावर कारखानाचे कामकाज सुरु आहे. सर्वांना समान वागणूक देण्याची परंपरा कारखान्याची आहे. कारखान्यावर शेतकर्यांची निष्ठा आहे. माझ्या कार्यकाळातील देणं मीच फेडणार आहे. कोरोनामुळे आर्थिक चक्रे थांबली आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
परंतु शेतकर्यांनी चिंता करु नये. आपल्यावर स्व.अण्णासाहेब पाटील यांची छत्रछाया आहे.सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी वरीष्ठ नेत्यांशी आणि संबंधित मंत्रींशी भेट घेतली आहे. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी या भागातील शेतकर्यांना सधन केले आहे. कारखाना शेतकर्यांच्या हक्काचा असून शेतकर्यांनी आपला ऊस कारखान्यालाच द्यावा. ऊसाला प्रति टन 2 हजार 365 रुपयाचा भाव दिला जाणार आहे.
ज्या सभासदाची नोंद आहे अशाच सभासदाला परतावा दिला जाणार आहे. कर्मचार्यांना दिवाळी बोनस म्हणून 1 हजार 888 रुपये दिले जातील. यावेळी आ.पाडवी म्हणाले की, अतिवृष्टी, कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी गेल्या आठ महिन्यापासून अडचणीतून जात आहेत. शेतकर्यांचा प्रश्न मिटला म्हणजे शेत मजूरांचाही प्रश्न मिटणार आहे.
शेतकर्यांचे गट तयार करुन त्यांना अनुदान देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना विमा कंपनीचे नियम शिथिल करुन मदत कशी करता येईल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत.गोमाई नदीवर बंधारे बांधण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शासन दरबारी माझे प्रयत्न सुरु आहेत. शहादा तालुक्यात रस्त्यांचे काम मंजूर झाले आहेत. त्यांची कामे लवकरच सुरु होणार आहेत. सिंचनासाठी निधी उपलब्ध असतो.
त्यासाठी शहादा व तळोदा मतदारसंघात सिंचनाच्या कामांवर अधिक भर देणार आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांनी केले. आभार संचालक रतीलाल पाटील यांनी मानले.







