नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – पतीसोबत काडीमोड झाल्यावर दुसरा संसार थाटण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलीला पंचायत भरवून जाब विचारला गेला. त्यानंतर ती बेपत्ता झाली म्हणून शोध घेतला जात होता. परंतु दोन आठवडे झाल्यावर घराजवळील झाडावरच त्या मुलीचे लटकलेले शीर मिळाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
समजलेले अधिक वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलिस ठाणे अंतर्गत मौजे जांगठी हे अतिदुर्गम गाव आहे. या गावातील सिपानपाडा येथील कालिका रामा वळवी या मुलीचा सिंदूरी गावातील मुलगा रायसिंग बामन्या वळवी यांच्या सोबत जाती रिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. परंतु दुर्दैवाने नांदवले गेले नाही म्हणून ती माहेरी परत आली.
दरम्यान, परिसरातील मजूर ठेकेदाराने तिला रोजगार मिळवून देत गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात नेले होते. दुसरा पती शोधून देण्यासाठी हा ठेकेदार प्रयत्नशील होता. परंतु त्याच वेळी मुलीच्या नातलगांनी आक्षेप घेतला. लग्न लावून देण्याच्या नावाखाली ठेकेदारावर पैसे मिळवणार असल्याचा आरोप केला. त्यामुळे मजूर ठेकेदाराने त्या मुलीला गावी परत आणले. १२ ऑक्टोबर रोजी संतप्त नातलगांनी गावात पंच बसवून सगळा प्रकार कथन केला. मुलीनेही आपबीती पंचांना सांगितली.
परंतु यानंतर (दि.१३) ऑक्टोबर २०२० पासून अचानक मुलगी बेपत्ता झाली. तिचा शोध घेत होतो, असे तिच्या नातलगांचे म्हणणे आहे. हा शोध चालू असतानाच दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी पूर्ण कुजलेले शरीर आणि डोक्याचा भाग मुलीच्या घराजवळील शेतात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या शेतातील एका आंब्याच्या झाडावर जमिनीवर लटकून आलेला डोक्याचा भाग शेतातील ज्वारी कणस कापणाऱ्यांना दिसला, असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील पोलिस पाटील, सरपंच, गावकरी व पंचांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर मोलगी पोलिसात खबर देण्यात आली. आता पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.







