वर्गमैत्रिणीला गुंगीचे औषध देऊन तरुणाने केला अत्याचार

rape-by-classmate

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – नागपूर येथे गुंगीचे औषध देऊन युवकाने वर्गमैत्रिणीवर अत्याचार केला. या अत्याचाराची मोबाइलद्वारे चित्रफीत काढून तिला ब्लॅकमेलही केले. तरुणीने जरीपटका पोलिस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी युवकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सौरभ संतोष तिवारी (वय २७ रा. पद्मावतीनगर, गोधनी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सौरभ हा औरंगाबादमधील कंपनीत काम करतो. पीडित २६ वर्षीय तरुणी ब्युटिशियन असून, ती आई व भावासह जरीपटका भागात राहाते.

 

पीडित तरुणी व सौरभ चौथ्या वर्गापर्यंत सोबत शिकले. २०१७ मध्ये शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. यात सौरभ व पीडित तरुणीही आहेत. याचदरम्यान दोघांची ओळख झाली. २०१८ मध्ये सौरभला औरंगाबादेतील कंपनीत नोकरी लागली. त्याने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. लग्नाची मागणी केली. विचार करून निर्णय घेईल,असे तरुणी त्याला म्हणाली.

दरम्यान, कंपनी बघण्यासाठी सौरभने पीडित तरुणीला औरंगाबादला बोलाविले. हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले. तरुणी औरंगाबादला गेली. सौरभने तिला हॉटेलमध्ये न नेता फ्लॅटवर नेले. हॉटेलबाबत विचारणा केली असता सौरभने खोली नसल्याचे सांगून तिची समजूत घातली. तो कंपनीत गेला. रात्री परतला. त्याने तरुणीला पाणी प्यायला दिले. पाणी पिताच तरुणी बेशुद्ध झाली. सौरभने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराची मोबाइलद्वारे चित्रफीत काढली. पहाटे तरुणी शुद्धीवर आली. अत्याचार झाल्याचे तिला समजले. तिने सौरभला जाब विचारला. लग्न करण्याचे आमिष सौरभने दाखविले.

 

त्यानंतर सातारा, पुणे व नागपुरात विविध ठिकाणी सौरभने तिच्यावर अत्याचार केला. मोबाइलमधील चित्रफीत व छायाचित्र दाखवून तिला ब्लॅकमेल केले. काही दिवसांपूर्वी सौरभचे अन्य एका तरुणीसोबत साक्षगंध झाल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. तरुणीने सौरभला विचारणा केली. सौरभ व त्याच्या नातेवाइकांनी तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने जरीपटका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. जरीपटका पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. सौरभचे वडील पोलिस कर्मचारी असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here