खडक पोलीस ठाण्यातच एपीआय आणि महिला वकिलाची हाणामारी

khadak-police-station

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पोलीस मुख्यालयातील दोन हाणामारीच्या घटनांनंतर आता तर थेट एका पोलीस ठाण्याच्या आवारातच सहायक पोलीस निरीक्षक आणि एका महिला वकिलामध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

शहरातील मध्यवर्ती खडक पोलिस ठाण्यात सातत्याने चर्चेत असणाऱ्या एका सहायक पोलीस निरीक्षकाला तत्कालीन पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले होते. त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याचे कारनामे सुरुच असल्याचे दिसून आले आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास एका महिला वकिलाने सहायक पोलीस निरीक्षकाला खडक पोलिस ठाण्याच्या आवारात गाठले . त्याठिकाणी त्यांची एका नाजूक विषयावरुन शाब्दिक बाचाबाची झाली.

 

त्यामुळे प्रकरण थेट हातघाईवर आले. त्याच रागातून महिला वकिलाने सहायक पोलीस निरीक्षकावर हात उचलला. दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर भांडणे सोडविण्याच्या उद्देशाने खडक पोलीस ठाण्याच्या महिला अमंलदाराने साहेबाची बाजू घेत वकिल महिलेला मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात झोन एकच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी मारहाणीची घटना घडली नसल्याचा दावा केला आहे.

 

पोलिस मुख्यालयात किरकोळ कारणावरुन दोन महिलांसह दोन पुरुषांमध्ये हाणामारीच्या दोन घटना ताज्या आहेत. त्यानंतर खडक पोलिस ठाण्यात महिला वकिल आणि सहायक पोलीस निरीक्षकाची एका नाजूक विषयावर हाणामारी चर्चेत आली आहे. त्यामुळे पोलिसांची हाणामारी थांबणार कधी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here