बुलढाणा (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठा अपघात भरधाव टँकरने पाच गाड्यांना दिलेल्या धडकेत बाप ठार तर मुलगा जखमी झाला आहे. ही घटना काल दुपारी घडली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बायपास वर जग्गु मामा ढाब्याजवळ काल दुपारी ३ च्या सुमारास नागपूर कडुन मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव टँकर (क्र. एम.एच. ०४ एचडी ४४४४) ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ४०७ गाडी (क्र.एम.एच. ०४ एजी ५९५०) छोटा हत्ती (क्र.एम.एच. ४९ एटी ४४७८), स्विफ्ट डिझायर (क्र.एम.एच. ०५ बीजे ०२२९), दुचाकी, ईंडिका व्हिस्टा क्रमांक (क्र.एम.एच. १९ वाय ५८४४) अशा पाच गाड्यांना जबर धडक दिली.
या धडकेत ४०७ मधील पांडुरंग शांताराम पाटील (४७, रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर) हे जागीच ठार झाले तर त्यांचा आठ वर्षीय मुलगा पवन पांडुरंग पाटील जखमी झाला आहे. जखमीवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातानंतर महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.







