मुंबई (हितेश मिस्त्री) – अंधेरी येथील फुटपाथवरून अपहरण करण्यात आलेल्या एक वर्षाच्य़ा मुलीला पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधून काढत आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांनी याबाबत दिलेला जबाब अत्यंत धक्कादायक आहे.
सचिन येलवे व सुप्रिया येलवे या चारकोप येथे राहणाऱ्या दाम्पत्याला मूल होत नव्हते. मूल नसल्याने या दाम्पत्याने रश्मी व राजू पवार या जोडप्याला त्यांच्यासाठी एखाद्या मुलाचे अपहरण करून त्यांना आणून देण्याचे काम दिले होते. त्यासाठी सचिन सुप्रिया त्यांना तीस हजार रुपये देखील देणार होते. दरम्यान राजूला अंधेरी येथील फुटपाथवर एक जोड़पे त्यांच्या एक वर्षाच्य़ा मुलीसोबत दिसले. त्यामुळे त्याने त्याच मुलीचे अपहरण करण्याचे ठरवले.
मुलीचे आई वडिल हे वेठबिगारीचे काम करत असून ते रात्री मुलीला घेऊन फुटपाथवरच झोपायचे. याचाच फायदा घेत मुलीचे आई वडिल झोपल्यानंतर रश्मी व राजूने मुलीला त्यांच्या पुढ्यातून उचलले व स्वत:सोबत घेऊन गेले. ते अंधेरीवरून रिक्षाने चारकोपला आले व ते मूल त्यांनी सुप्रियाच्या ताब्यात दिले.
दरम्यान अपहरण झालेल्या मुलीच्या आईला जाग आल्यानंतर तिला पुढ्यात मुलगी दिसली नाही. तिने व नवऱ्याने मुलीला सर्वत्र शोधले मात्र मुलगी न सापडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना राजू व रश्मी मुलीला घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी त्यांनंतर रिक्षावाल्यांकडे चौकशी केली असता त्यांना अधिक माहिती मिळाली व अवघ्या दोन तासात त्यांनी या अपहरणनाट्याचा छडा लावला.
काही वेळातच पोलीस सुप्रिया व सचिनच्या चारकोपच्या घरी पोहचले. त्यावेळी रश्मी व राजू देखील तेथेच होते. पोलिसांनी त्या चौघांनाही अटक करत मुलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले.







