पदाधिकारी – शाखा बदलूनही सांस्कृतिक क्षेत्राबाबत उदासीनता :
पाच वर्षांच्या कालावधीत केले फक्त पाच कार्यक्रम
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कलावंतांच्या हक्कांसाठी लढणारी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थेकडे पाहिले जाते. जळगाव जिल्हा आणि अ.भा. नाट्य परिषदेचा संबंध तसा जुना आहे. नाट्यसंमेलन घेणे, कोणतेही कार्यक्रम न घेतल्यामुळे शाखेचे पदाधिकारी बदलणे या सर्व खोखोच्या खेळात नाट्य बाजूला राहून कुरघोडीच्या राजकारणाच्या नाट्यातच जळगावची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गुंतलेली दिसून येते.
प्रथमतः जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय नाट्य परिषद आणली ती पेण येथील पांडूरंग घांग्रेकर यांनी. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात नोकरीसाठी आलेल्या या माणसाने येथील सांस्कृतिक वातावरण वृध्दिंगत व्हावे म्हणून नाट्यपरिषदेची शाखा स्थापन केली. त्यावेळेस तिथे असणारे तत्कालीन नेते स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी व स्व.जे.टी. महाजन यांचे त्यांना मोठे आर्थिक पाठबळ लाभले. त्यामुळे साहजिकच तेथे सांस्कृतिक वातावरण वृध्दिंगत झाले. विविध शाळांमध्ये बालनाट्य शिबिरे, कार्यक्रमांचा पांडूरंग घांग्रेकर यांनी धडाका लावला होता. जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील लिटील फ्लॉवर या शाळेतील मुलांचा कार्यक्रम नाट्यदर्पण रजनीमध्ये सादर करणारी फैजपूर अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा म्हणून वैभवशाली परंपरा या शाखेला त्यांनी निर्माण करुन दिली. मात्र त्यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर ती शाखा अकार्यक्षम होवून बंद पडली.
त्यानंतर दहा ते बारा वर्षांनी जळगावातील दिपक चांदोरकर यांनी जळगाव शहर शाखा सुरु केली. त्यात अंतर्गत राजकारणात काही कारणांनी ती शाखा पुढे दिपक चांदोरकर यांच्याकडून श्रीपाद जोशी यांच्याकडे आली. श्रीपाद जोशींनी रंगभूमी दिन, एकांकिका स्पर्धा असे काही मोजके कार्यक्रम करत ही शाखा जिवंत ठेवली, पण यात सांस्कृतिक वातावरणाचे वृध्दींगत्वापेक्षा मध्यवर्ती नियामक मंडळात सदस्यत्व मिळणे व मुंबईच्या नाट्यवर्तुळात आपले स्थान निर्माण करणे यासाठी त्यांनी या शाखेचा वापर केला.
ते अकार्यक्षम असल्याने जळगाव येथील सुनिल पाटील यांनी मध्यवर्ती शाखेशी संपर्क करीत, जळगावातील नाट्यकर्मींचे एकत्रीकरण करत शाखा स्थापनेचे प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांदरम्यान मध्यवर्तीकडून त्यांना जळगाव शहर शाखा सुरु असल्याने, शहरात शाखा देता येत नाही असे कारण सांगितले व जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील शाखा स्थापनेविषयी सहकार्य दर्शविण्याची तयारी केली. त्यानुसार मग मुक्ताईनगर शाखेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली. 
या शाखेतर्फे सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, कलावंतांना व्यासपीठ मिळावे व त्यासाठी राजकीय वलय व आर्थिक पाठिंबा मिळावा तसेच जळगावच्या रंगकर्मींची जळगाव येथे नाट्यसंमेलन व्हावे ही प्रलंबित पूर्ण व्हावी यासाठी ९ एप्रिल २०१६ ला तत्कालीन महसूल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर यांना अध्यक्षपदी घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची मुक्ताईनगर शाखा मोठ्या उत्साहात जळगावातील जे.डी.सी.सी. बँकेच्या नाट्यगृहात तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. या कार्यक्रमात नाट्यसंमेलनासह एकंदरीत सांस्कृतिक वातावरण वृध्दिंगत होण्यासाठी विविध आश्वासनांची बरसात करण्यात आली. 
शाखेच्या उद्घाटनानिमित्त दोन नाटकांचे प्रयोगदेखील करण्यात आले. जळगावकर रंगकर्मींना जळगाव शाखेपेक्षा मुक्ताईनगर शाखा जवळची वाटू लागून त्यांनी या शाखेला समर्थन देण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच २ सप्टेंबरला नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ येथील संत एकनाथ या नाटकाचा नाट्यप्रयोगही जळगावातील गंधे सभागृहात घेण्यात आला. यामुळे नाट्यकलावंतांसह नाट्यरसिकदेखील या शाखेच्या कार्याबद्दल आश्वस्त झाले.

पर्यायाने जळगाव शाखेचे महत्व कमी झाले, यामुळे श्रीपाद जोशी यांनी मुक्ताईनगर शाखेच्या स्थापनेलाच आक्षेप घेत मध्यवर्तीकडे ही शाखा बंद करण्याची मागणी केली. मात्र मध्यवर्ती शाखेने याबाबत असमर्थता दर्शवित, श्रीपाद जोशी यांच्या कार्यकाळावर ठपका ठेवला. दरम्यान श्रीपाद जोशींच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत त्या शाखेतील सदस्य व जळगावातील जुने नाट्य दिग्दर्शक रमेश भोळे यांनी मध्यवर्ती शाखेत अध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी बोलत जळगाव शाखा आपल्या ताब्यात घेतली व नवीन कार्यकारिणीची स्थापना करत कार्यक्रमांना सुरुवात केली. अभिवाचन शिबिर, नाट्यशिबिर असे विविध कार्यक्रम घेणे सुरु केले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणीही सुरु केली.
दरम्यानच्या कालावधीत मुक्ताईनगर शाखेकडून या दोन कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न झाल्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे नाट्यकर्मी आता रमेश भोळे यांच्या जळगाव शाखेकडे आशेने पाहू लागल्या आणि पुन्हा जळगाव जिल्ह्यातील नाट्यवर्तुळात कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. या प्रकारात एकंदरीतच जळगाव शाखा ही अकार्यक्षम असून, अनधिकृतरित्या कार्यक्रम करीत असल्याचे तसेच त्यांची कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याचे अनेक तांत्रिक मुद्दे पुढे आणत २५ जून २०१९ ला रमेश भोळे व सहकाऱ्यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जळगाव शहर शाखा त्यांना कोणतीही सूचना न देता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुक्ताईनगर शाखेत विलीन करण्यात आली. या धोरणाविरोधात रमेश भोळे यांनी मध्यवर्तीकडे दाद मागत जळगावातील वर्तमानपत्रातून आक्षेप घेतला परंतु राजकारणातील प्रभावशाली वर्तुळापुढे त्यांचा निभाव लागला नाही व जळगाव शहरशाखा विलीन करीत २५ जून २०१९ ला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली.

या शाखेच्या कार्यकारिणीत बदल करीत मुक्ताईनगर शाखा आणणाऱ्या सुनिल पाटील यांनाच तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे वगळण्यात आले. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रोहिणीताई खडसे कायम राहत उपाध्यक्ष म्हणून संजय राणे, शंभू पाटील, कोषाध्यक्ष प्रा.शमा सराफ, मुख्य कार्यवाह पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल व शरद भालेराव, कार्यकारिणीमध्ये चिंतामण पाटील, संदीप घोरपडे, हेमंत पाटील, अनिल कोष्टी, विनोद ढगे, पंकज नन्नवरे, शरद पांडे, महिमा मिश्रा, गिरीश कुळकर्णी, प्रविण पांडे, दिपिका चांदोरकर तसेच काही निमंत्रित सदस्यांचाही समावेश करण्यात आला. 
अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत स्थापलेल्या शाखांचीही उदासीनता
कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांसाठी शासनदरबारी लढाई लढता यावी व सांस्कृतिक वातावरण वृध्दिंगत व्हावे या नेहमीच्याच मुद्दयांना पुढे आणत गेल्या २७ वर्षांपासून जळगाव येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमध्ये शाखा व पदाधिकाऱ्यांची हुतूतू सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र कार्य कोणतेच होताना दिसून येत नाही. केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नाट्यात मूळ नाट्य कधीच हरवून गेले असून, केवळ पदाधिकारी बनण्याची हौस असणारे अकार्यक्षम व नाटकाशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांच्या हातात नाट्य परिषद गेल्याचे सध्या दिसून येत आहे.
नव्या उभारीने कार्य करु म्हणून स्थापन झालेल्या २०१६ मधील मुक्ताईनगर शाखेचा गेल्या पाच वर्षांचा प्रवास पाहता शाखा उद्घाटनाचा दोन नाट्यप्रयोगांचा महोत्सव, २ सप्टेंबर २०१६ चा नाथाभाऊंच्या वाढदिवसानिमित्तचा नाट्यप्रयोग, मान्यवर लेखक प्रेमानंद गज्वी यांची लेखन कार्यशाळा, २०१९ ला ५ नोव्हेंबरला रंगभूमीदिनाचा कार्यक्रम व आजचा ५ नोव्हेंबरचा जागतिक मराठी रंगभूमीदिनानिमित्त होत असलेला नटराजपूजनाचा कार्यक्रम म्हणजे एकंदरीत पाच वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल पाच कार्यक्रम करण्याचा पराक्रम या शाखेने केलेला आहे.
जळगाव जिल्हा नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीतील ‘हा’ पराक्रमी पदाधिकारी
नाट्यकलावंतांच्या हक्कासाठी लढणारी संस्था म्हणून नाट्यपरिषदेचा लौकिक असताना, जळगाव जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीत संदीप घोरपडे नावाच्या पराक्रमी पदाधिकाऱ्याने दुसऱ्या लेखकाने लिहिलेली संहिता ढापून ती थेट महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्धेत सादर करण्याचा पराक्रम केला आहे. याबाबत पुणे येथील संबंधित लेखकाने संदीप घोरपडेंना कायदेशीर नोटीसदेखील बजावली असून, ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्यानंतरही या नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणी सदस्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, ही शाखा खरच आपल्या हक्कांसाठी लढणार का? याविषयी जळगाव रंगकर्मींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
https://khabrilalnews.co.in/383/
पदाधिकाऱ्यांमध्येही आहे नाराजी
पदाधिकारी बनण्याच्या हौसेने जमा झालेल्या हौश्यागवश्यांनी कार्यकारिणी व्यापलेली असल्याने, मूळ नाट्यकर्मी असलेल्या पदाधिकाऱ्यांची जळगाव जिल्हा शाखेत गोची होत असून, त्याबाबत त्यांची नाराजी असल्याचे वातावरण आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये कोषाध्यक्ष असलेल्या प्रा.शमा सराफ या त्यांनी केलेल्या कार्यक्रमांचा खर्च अव्वाचा सव्वा वसूल करत असताना इतर पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांची साधी विचारपूसही करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या कार्यक्रमांसाठी पदरमोड करून खर्च करणारे तसेच या कार्यक्रमांसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत नाराजी असल्याचेही समजते.
एकंदरीतच कुरघोडीच्या राजकारणामुळे व पदाधिकाऱ्यांमधील उदासीनतेमुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगावचे शाखांची नावे बदलली, पदाधिकारी बदलले दैन्यत्व संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.







