जिल्ह्यातील हौशी नाट्यनिर्मात्यांच्या संघाची स्थापना
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव ही शैक्षणिक संस्था निव्वळ खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख प्राप्त केलेली संस्था आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आपला अमृत महोत्सव साजरा केला. याच्या पुढच पाऊल म्हणजे के.सी.ई.चे मु.जे.(स्वायत्त) महाविद्यालय संचलित कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांनी मराठी रंगभूमी दिन आज वेगळ्या स्वरुपात साजरा केला गेला. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील हौशी नाट्य निर्मात्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांतजी वडोदकर, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, कान्ह ललित कला केंद्र समन्वयक मिलन भामरे, ज्येष्ठ नाट्य निर्माता चिंतामण पाटील यांनी आपल्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन केले. या कार्यक्रमाचा उद्देश हा रंगभूमी दिन सालाबादप्रमाणे साजरा करणे हा नसून या वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील हौशी नाट्य निर्मात्यांची एक अखिल भारतीय मराठी हौशी नाट्य निर्माता संघ संस्था स्थापन करणे हा होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जाधव यांनी केले. या नंतर नटराज पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात भुसावळ येथून आलेले नाट्य निर्माते विरेंद्र पाटील यांनी नाट्य निर्माता संघाची निर्मिती आणि उद्देश यावर सगळ्या निर्मात्यांच्या वतीने आपले विचार आणि संकल्पना मांडली. यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नाट्य स्पर्धा किंवा नाट्य सादरीकरणावर झालेला परिणाम आणि येत्या काळात अशाच काही अडचणींना आणि संकटांना सामोरे जाण्यासाठी सर्व नाट्य निर्मात्यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. यात के. सी. ई. चे मु. जे. (स्वायत्त) महाविद्यालय संचलित कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांनी आपल्या निर्माता संघासाठी मदत करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली.
के. सी. ई. चे सांस्कृतिक समन्वयक शशिकांतजी वडोदकर यांचा सत्कार जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नाट्य निर्माते चिंतामण पाटील यांनी सर्व नाट्य निर्मात्यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला त्या सत्कारास उत्तर देतांना श्री. वडोदकर यांनी नाट्य निर्माता संघ निर्माण केल्याबद्दल अभिनंदन केले आणि या संघात असलेल्या नाट्य निर्मात्यांच्या सोबत आमची के. सी. ई. सोसायटी भक्कमपणे उभी आहे असे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे यांच्या वतीने आश्वासित केले. या संघात या नंतर अनेक नाट्य निर्मात्यांनी आपापली सदस्यता घेऊन हौशी नाट्य चळवळीला भक्कम करत न्यावे आणि आपल्या जळगावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या संघाच्या शाखा निर्माण व्हाव्यात अशी आशा व्यक्त केली.
यानंतर नाट्य निर्माता संघाच्या लोगोचे (मानचिन्हाचे) अनावरण शशिकांतजी वडोदकर, प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे आणि चिंतामण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हौशी नाट्य चळवळीला प्रोत्साहन आणि बळ देणे, नाट्य निर्मितीसाठी असलेल्या उणीवा, समस्या, अडचणी अशा बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या सुधारणे, आणि हौशी नाट्य निर्मितीमधील नाट्य निर्मात्यांना आर्थिक मदत करणे हे या संघाचे मुख्य ध्येय आणि उद्दिष्टे असतील असे जाहीर करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमध्ये भुसावळ येथील वीरेंद्र पाटील आणि अनिल कोष्टी, तसेच जळगावातील नाट्यनिर्माता विशाल जाधव, किरणकुमार अडकमोल, हनुमान सुरवसे, संगीत विभागाचे प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे, नृत्य विभागाचे प्रमुख अजय शिंदे, नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत पाटील आणि कान्ह ललित कला केंद्राचे काही मोजके विदयार्थी उपस्थित होते.







