कुऱ्हे पानाचे (गिरीश पवार) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील पाटील गल्लीतील २९ वर्षीय तरुणाची गुरूवारी रात्री कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी सकाळी तरुणाला उपचारासाठी भुसावळ येथे दाखल करण्यात आले आहे. रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुसावळ तालुक्यात या अगोदर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला आहे परंतू गावात मात्र अद्याप पर्यंत शिरकाव केला नव्हता. मात्र गुरुवारी रात्री उशिरा २९ वर्षीय तरुणाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या चार दिवसापासून त्याला व त्याच्या भावाला थोडी सर्दी व तापाचे लक्षण जाणवत होते. त्यामुळे त्यांनी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना कोविड ची चाचणी करण्यास सांगितले. ३० जूनला त्यांनी भुसावळ येथील कोविड सेंटरमध्ये(नवोदय विद्यालय) स्वँब दिला. तेव्हा पासून तो घरीच होता. गुरुवारी रात्री त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्या भावाचा अहवाल निगेटीव्ह आला.
त्याच्यावर भुसावळ येथील कोविड सेंटर (आंबेडकर वसतिगृह) मध्ये उपचार सुरू आहे. सद्या त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्याची तब्बेत चांगली आहे. त्याच्या कुटुंबातील आई, वडील व भाऊ अश्या तीन जणांना भुसावळ येथील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमध्ये कॉरनटाईन ( विलगिकरण) करण्यात आले आहेत. रुग्ण आढळल्याने कुऱ्हे पानाचे येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने त्वरित रुग्णाचे निवास्थान असलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी केली. ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात फवारणी करून, पाटील गल्ली परिसरातील रस्ते बंद केले असून गावात जनजागृती करण्यासाठी दवंडी देण्यात आली आहे. आता पर्यंत गावात एकही रुग्ण नव्हता त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीती नव्हती. परंतु आता रस्ते ओस पडलेली दिसत आहे.







