कोल्हापुरात महावितरणचा बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

kolhapur-acb

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – लाच न घेण्याची शपथ घेऊन चार दिवस उलटण्यापूर्वीच महावितरण कार्यालयात लाचखोर अधिकारी एसीबीच्या कचाट्यात सापडला. सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये स्वीकारताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

 

तक्रारदाराच्या वडिलांचे सौर यंत्रणा विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. तक्रारदाराच्या ग्राहकाच्या घरी दहा किलोवॅटची सौर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी ग्राहकाच्या नावाने रितसर अर्ज उत्तर उपविभाग, नागाळा पार्क येथील महावितरणच्या कार्यालयात दिला. संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता मांडके यांची भेट घेऊन सौर यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या दहा किलोवॅट वीजेबाबत तक्रारदाराने चर्चा केली. त्यावेळी मांडकेने तक्रारदाराला प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी सहा हजार रूपये द्यावे लागतील; तरच मी तुमचे काम मंजूर करून देईन, नाहीतर देणार नाही, असे सांगितले. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

 

 

शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदारांच्या समक्ष पडताळणी केली असता, पडताळणीमध्ये सहा हजार रूपयांची लाच मांडके याने मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम त्वरीत घेवून येण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारतना त्यास रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here