सराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला नगर पोलिसांनी केला पर्दाफाश

crime-with-saraf

नगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये सराफी व्यावसाय करणाऱ्या दोघा बंधुंना मारहाण करून ७० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका सराफाचाही समावेश असून, त्यानेच आरोपींना माहिती देऊन हा गुन्हा करवून घेतल्याचा संशय आहे. पाळत ठेवून सराफांना लुटणाऱ्या आतंरजिल्हा टोळीचा नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. एक नोव्हेंबरला नगर-सोलापूर महामार्गावर ही घटना घडली होती. अतुल चंदकांत पंडीत (रा. मिरजगाव) आणि त्यांचे बंधू दुकान बंद करून कारमधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले. कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग घेऊन चोरटे पसार झाले. दरोड्याच्या या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख, १६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यांचे अन्य साथीदार अद्याप फरारी आहेत.

 

त्या दिवशी घटना घडल्यानंतर नागरिक मदतीला धावले. त्यामुळे चोरटे एक दुचाकी तेथेच सोडून पळाले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानुसार आण्णा उर्फ आण्णासाहेब रामहरी गायकवाड (वय २८, रा. विनोदेवस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड, पुणे), संदेश उर्फ बाळा महादेव डाडर ( रा. लांगोरगल्ली, कर्जत), भारत उर्फ सागर नवनाथ साळवे (वय २४, रा. राशिन, ता कर्जत), गणेश चंद्रकांत माळवे ( रा. रायकरमळा, यवत, जि. पुणे), अक्षय उर्फ बंटी बाबुराव धनवे (रा. प्रेमदान हाडको, नगर) व राम जिजाबा साळवे (रा. राशिन ता. कर्जत) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली.

 

पोलिसांच्या तपासात उघड झाले की, यातील आरोपी माळवे हाही सराफ आहे. मिरजगावमध्ये एका नातेवाइकाकडे येत असल्याने त्याला पंडित यांच्यासंबंधी माहिती होती. त्यानेच ही माहिती आरोपींना पुरवून हा गुन्हा घडवून आणला. लुटीच्या मालात त्याचाही वाटा ठरलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील आरोपी सराईत असून यापूर्वीही त्यांच्याविरूद्ध नगर जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भात विविध गुन्हे दाखल आहेत. यातील सराफ माळवे केवळ पैशांसाठी आरोपींना टीप देत असे की आणखी काही व्यावयासिक कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here