हडपसरमध्ये सुरक्षारक्षकाची हत्या

murder

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – हडपसर येथे सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी हडपसरमधील भोसले गार्डनशेजारील कापरे मळा येथे उघडकीस आली.

 

 

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता साहेबराव कांबळे (वय ५६, रा. माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. शोभा दत्ता कांबळे (वय ५१) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता कांबळे हे माळवाडी येथे राहतात. ते सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने ते घरीच होते. बुधवारी दुपारी दीड वाजता मुलाकडून पन्नास रुपये घेऊन घराबाहेर गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. गुरुवारी सकाळी दहा वाजता कापरे मळा येथे त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या तोंडावर दगडाने मारहाण करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here