8 वर्षापूर्वी झालेल्या माथाडी कामगाराच्या हत्येच्या आरोपीला केले गजाआड

navi-mumbai-police

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे यांची पदभार स्वीकारल्यानंतर धडक कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोानि गिरीधर गोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासातच 8 वर्षापूर्वी माथाडी कामगाराच्या हत्येप्रकरणी सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे.
29 डिसेंबर 2012 मध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियोजित तुर्भे एस.टी.डेपोच्या गेटवर सेक्टर 20 तुर्भे येथे आनंदा बाबुराव सुकाळे (55) यांची अज्ञात इसमाने डोक्यामध्ये बोथड वस्तूने वार करून तसेच नायलॉनच्या गोणीने गळा आवळून जीवे ठार मारले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

 

 

सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.बी.जी.शेखर पाटील, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व सहा.पो.आयुक्त विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे, सपोनि गणेश कराड, सपोनि संदीप गायकवाड, सपोनि शरद ढोले, स.फौ.पाटील, पोहवा साळुंखे, पाटील, गडगे, पवार, तरकासे, वाघ, सुर्यवंशी, पो.ना.कुदळे, म्हात्रे, पाटील, कानू, मोरे, पो.शि.भोपी आदींचे पथक शोध घेत असताना गुप्त बातमीदार तसेच तेथील सुरक्षा रक्षक यांना विश्‍वासात घेवून माहिती घेतली असता एका सुरक्षा रक्षकाने हा सर्व प्रकार बघितला होता व त्याबाबत त्याने माहिती देताना सराईत आरोपी दशरथ विठ्ठल कांबळे याची माहिती दिली.

 

 

त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जुगारामध्ये आनंदा सुकाळे यांनी 25 हजार रुपये जिंकले होते ते पैसे जबरीने चोरी करण्यासाठी त्याने ही हत्या केली होती. त्याच्यावर यापूर्वी सुद्धा जबरी चोरी, चोरी, दरोडा असे गुन्हे केलेले असून त्यास यापूर्वी हद्दपार करण्यात आलेली आहे. अखेरीस गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने 8 वर्षापूर्वीच्या खुनाला वाचा फोडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here