थेट रस्त्यावर होर्डिंगवर जाऊन बसली : प्रियकराने आर्जव केल्यानंतर खाली उतरली
इंदूर: मध्य प्रदेशची राजधानी इंदूरमध्ये काल एका वेगळ्याच घटनेची चर्चा होती. ही घटना म्हणजे एक मुलगी आपलं लग्न आवडत्या मुलासोबतच लावण्यात यावं यासाठी थेट रस्त्यावरील मोठ्या होर्डिंगवरच जाऊन बसली. खरं तर मुलीला आपल्या आईने ठरविलेल्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. तिला तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं. यासाठीच तिने आपला जीव धोक्यात घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी अल्पवयीन आहे. मुलीला तिच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करायचं होतं पण तिची आई त्यासाठी तयार नव्हती. याचाच राग आल्याने मुलगी थेट रस्त्याच्या कडेला होर्डिंगवर जाऊन बसली. ही घटना इंदूरच्या परदेशीपुराची आहे. वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या फोटोमध्ये ही मुलगी होर्डिंगच्यावर बसलेली पाहायला मिळते आहे.
होर्डिंगवर बसलेली मुलगी पाहून जवळपासचे लोक तिथे जमले. याबाबत माहिती मिळताच पोलिसही तेथे पोहोचले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुलीशी ज्या मुलीशी लग्न करायचे आहे त्याच्याशी संपर्क साधला गेला. परदेशीपुराचे एसआय अशोक पाटीदार यांनीही असे सांगितले की,याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मुलाशी तात्काळ संपर्क साधून त्याला घटनास्थळी बोलावलं.
घटनास्थळी पोचल्यावर मुलाने मुलीला खाली येण्याचा आग्रह केला. त्यानंतरच ती खाली आली. पाटीदार म्हणाले, ‘मुलगी आपल्या आईची इच्छा असलेल्या मुलासोबत लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळेच ती थेट होर्डिंगवर जाऊन बसली होती. अखेर तिला आवडणाऱ्या मुलाने जेव्हा खाली येण्यास सांगितलं तेव्हाच ती खाली आली.’







