पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बालाजीनगर येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळला. हा प्रकार मंगळवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आला आहे.
बालाजीनगर, भोसरी येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. शौचालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी बाजूलाच एक टाकी बांधण्यात आली आहे. टाकीची स्वच्छता सुरू असताना एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला.
याबाबत नागरिकांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून सांगाड्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
आढळलेल्या हाडांचा सांगाडा साधारणतः साठ वर्षावरील वयाच्या व्यक्तीचा असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.







