जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज जागतिक शौचालय दिन साजरा होत आहे. पण या पार्श्वभूमीवर विचार करता, हा दिवस साजरा करण्याची का गरज भासावी हे विचार करण्याची आज खऱ्या अर्थाने निकड आहे. जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे.
उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत बांग्लादेश आणि व्हिएतनाम सारख्या अनेक देशानी समाधान कारक प्रगती केली आहे. सबसहारन आफ्रिकेतील 26 देशानीही याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे अतिसार, आमांश, कावीळ आणि विषमज्वर यासारखे अनेक आजार होण्याची शक्यता असते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छता व आरोग्य कार्यक्रमाचे समन्वयक ब्रूस गॉर्डन यांनी म्हटले आहे. उघड्यावर शौचास बसण्याचे गंभीर प्रभाव पाच वर्षाखालील मुलांवर जास्त प्रमाणात दिसून येतो आणि ही मुले दगावण्याची शक्यता जास्त असते.
आपल्या जीवनात स्वच्छतेचे किती महत्त्व आहे ? यापासून जनता कोसो दूर आहे. याउलट घराबाहेर जाऊन करावयाची क्रिया घरात केल्याने अस्वच्छता अजुन वाढते असा गैरसमज लोकांच्या मनात आज ही घर करून आहे. शौच करणे म्हणजे पोटातील सर्व घाण बाहेर टाकणे होय, मग ती क्रिया घरात करण्यापेक्षा घराबाहेर केलेलेच बरे असे लोकांना वाटते. परंतु तीच घाण विविध आजाराच्या स्वरुपात अधुनमधून घरात शिरकाव करते याची त्यांना पर्वा नसते. मोठी माणसे गावाबहेर जातील परंतु लहान मुले तर घराच्या आजूबाजूला शौच करतात. त्या घाण विष्ठेवर बसलेले माशा घरात येऊन अन्नावर बसतात याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. घराच्या आजूबाजूला लहान मुले शौचास बसण्याच्या कारणावरुन बऱ्याच ठिकाणी वाद, तंटे, भांडण सुध्दा होतात. महिला भगिनीना उघड्यावर शौचास जाताना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. घरातील महिलांना मानसन्मान मिळावे, त्यांची लाज राखली जावी याचा विचार करताना ती शौचास उघड्यावर जाऊ नये याचा मात्र कुणी विचार करीत नाहीत. वयोवृध्द लोकांना सुध्दा उघड्यावर शौचास जाताना त्रास होतो. थकलेले वय आणि चालणे होत नसल्यामुळे त्यांची सुध्दा कुचंबणा होते. विशेष करून पावसाळ्यात घरातील सर्वच सदस्याना उघड्यावार शौचास जाताना त्रास सहन करावा लागतो. तरी ही लोकांना शौचालयाचा वापर करावा असे वाटत नाही याचा अर्थ लोकांमध्ये याबाबतीत फारच अनास्था दिसून येते. त्यास्तव अजुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे वाटते.
शौचालय प्रकरण गंभीर असले तरी त्याचा इतिहास रंजक आहे बरं. मोहेंजोदडो किंवा लोथलमध्ये इ.स. २५०० पूर्वी लोक शौचालय वापरायचे. आपल्या गड-किल्ल्यांमध्येही शौचालय आढळून येते. या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्यांची ऐतिहासिक शौचालये पाहू. फ्रान्सचा सम्राट तेरावा लुईस हासुद्धा शौचालयाचा वापर करे. मात्र, त्याचे शौचालय राजसिंहासनामध्येच होते. दरबारात चौकशी करता करता तो शौचाला बसे. त्यामुळे शौचासाठी त्याला बाहेर जाण्याची गरज नसे. तर समता-बंधुता वगैरे मानणार्या पाश्चात्त्य देशांमध्ये उमराव वगैरेंच्या काळात गुलाम हातात शौचाचे भांडे घेऊन उभे राहत. या उमरावांना खेळता खेळता लघवी आली की, गुलाम हे पात्र घेऊन त्यांच्यापुढे उभे राहत. इतकेच काय? एकावर एक अंतर राखून शौचालयाचे दोन भांडे असलेलेही शौचालय असे. कारण काय, वरचे शौचालयाचे भांडे मालकाचे तर त्याच्या खालचे गुलामाचे. गुलामांना त्रास देण्याची इतकी हिडीस संकल्पना. हो, महाराणी व्हिक्टोरियाही हिरेजडित शौचालयाचा वापर करीत असे. राणीचा काळ सोडा, सध्या जेनिफर लोपेझ या प्रसिद्ध पॉप गायिकेला तिचा प्रियकर बेन एफ्लेकने अद्यावत किमती शौचालय भेट दिले होते. आज जगात भारतीय, पाश्चिमात्त्य आणि जपानी पद्धतीचे शौचालय मान्यता पावलेले आहे. तरीही रासायनिक शौचालय, ज्यामध्ये पाणी आणि रसायन टाकले की, शौच नष्ट होते, असेसुद्धा शौचालय विकसित झाले आहे. तसेच सगळ्यात महागडे शौचालय आहे ते इंसिलोनेट शौचालय. हे शौचालय मायक्रोव्हेवसारखे काम करते. विजेचे बटण दाबले की, शौचाची राख होते.
जागतिक शौचालय संघटनेच्या प्रयत्नांतून २००१ साली, १९ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून जाहीर झाला. जागतिक शौचालय संघटनेचे निर्माता जॅक सिम आणि सिंगापूरच्या रेस्ट्रम असोसिएशन शौचालयाच्या जागृतीसाठी जागतिक स्तरावर जागृती व्हावी म्हणून या दिनाकडे पाहिले जाते. शौचालय म्हटले की डोळ्यासमोर टाळायलाच हव्या, असे वाटावे अशा गोष्टी समोर येतात. खरे तर समाज आणि आरोग्य अभ्यासकांच्या मते, शौचालय हे स्वयंपाकघराइतकेच स्वच्छ आणि महत्त्वाचे असायले हवे. कारण, शौचालय ही माणसाच्या आयुष्यातली कितीही ठरवले तरी न टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. माणसाला शौचालयाची गरज लागतेच लागते. अर्थात, शौचालयाचा वापर अनिवार्य असला तरी जगभरात ४० टक्के लोकांना शौचालयाची उपलब्धी नाही. भारतात २०१४ सालापासून गाव आणि शहरांमध्ये शौचालय निर्मितीचा धडाका सुरू झाला. आपल्या देशाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा विचार केला तर? तर पाकिस्तानमध्ये ४२ टक्के लोकांना शौचालयाची सुविधा नाही. तसेच जागतिक स्तरावर अत्यंत कमी शौचालय असणारा देश म्हणून इथिओपियाचे नाव अग्रणी आहे.
काही समाज आणि आरोग्य शास्त्रज्ञांच्या मते, २०० वर्षांपासून माणसाचे जीवनमान २० वर्षांने वाढले आहे. कारण, माणसाने शौचव्यवस्थेसंदर्भात काळजी घेण्यास सुरुवात केली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की जगभरात साथीचे रोग यायचे, त्या साथीच्या रोगाने माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरत. हे साथीचे रोग कोणते? तर पाण्यातून किंवा अन्नातून होणार्या जंतुसंसर्गामुळे हे रोग होत. अन्न आणि पाण्याला जंतुसंसर्ग व्हायचा तो उघड्यावर होणार्या शौचामुळे किंवा शौचाची विल्ेहवाट व्यवस्थित न झाल्यामुळे. आधुनिक जीवनमानात माणसाने खाण्या-पिण्या- राहण्यासोबतच शौचासंदर्भातीलही सवयी बदलल्या. त्यामुळे माणसाचे आयुर्मान वाढले. जागतिक स्तरावर एक मूल्यांकन आहे की, जर स्वच्छ पाणी आणि शौचालयावर १ डॉलर खर्च केला तर आपले आरोग्यावर खर्च होणारे ४.३ डॉलर वाचतात. हे खरेच आहे कारण, नुकतेच १४५ देशांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यानुसार दररोज २२०० मुलं उघड्यावर शौच केल्यामुळे होणार्या आजाराने मृत्युमुखी पडतात. उघड्यावर शौच केल्यामुळे स्वच्छता करण्यासाठी किंवा आजारांवर उपाय करण्यासाठी आपल्या भारताचे तर वार्षिक २४ कोटी रुपयांचे नुकसान होते. यावरूनच या समस्येचे गांभीर्य लक्षात येते.
दोन वेळेसचे खायाला पोटभर मिळत नाही तेंव्हा शौचालय कुठून बांधणार ? असा सवाल ग्रामीण भागातील लोक सहजतेने बोलून जातात. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट व कठीण असल्यामुळे ते स्वतःसाठी चांगला निवारा बांधू शकत नाही तेंव्हा शौचालयाचा विचार त्यांच्या डोक्यात तरी कसा येईल ? ग्रामीण भागातील बहुतांश जनता दारिद्रयरेषेखालील जीवन जगतात. त्यांचे पोट रोजच्या मोलमजुरीवर अवलंबून असते. त्याचसोबत त्यांच्या घरात खाणाऱ्याची तोंडे जास्त आणि कमाविणाऱ्याचे हात कमी यामुळे नेहमीच आर्थिक चणचण त्यांना सतावित असते. शौचालयापेक्षा त्यांना पोट भरण्याची काळजी जास्त असते. म्हणूनच ते या विषयाकडे म्हणावे तेवढे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.याउपर ही अशा गरीब आणि दारिद्रयाच्या खाईत असलेल्या लोकांनी मनात आणले तर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे पैशाची नियमित बचत करून शौचालय बांधू शकतात. आज ग्रामीण भागात ज्याच्या हातात मोबाईल नाही असे एक ही घर शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या घरी शौचालय नाही मात्र मोबाईल नक्कीच सापडेल. कारण आज लोकांना त्याची जास्त गरज वाटू लागली आहे.
ग्रामीण भागात एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात लोटा असे विदारक चित्र दिसून येते. लोकांना शौचालयापेक्षा मोबाईल खुप महत्वाचे वाटते, त्यामुळे आपण निर्णय घ्यायचे आहे मोबाईल महत्वाचे आहे की शौचालय ! याविषयी भारतीयांनी गांभीर्याने विचार करुन, निकड ओळखून, स्वच्छ भारत ; समृद्ध भारत होण्याचे स्वप्नपूर्तीचा निर्धार केला पाहिजे.







