वाचाळ नेत्यांमुळेच काँग्रेसचे नुकसान – मल्लिकार्जुन खरगे

mallikarjun-kharge

नवी दिल्ली – बिहारमधल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेलं भांडण थांबण्याचं नाव घेत नाही. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी एका मुलाखतीत काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बलांवर हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही सिब्बल यांच्यावर जोरदार टीका केलीय. अशा वाचाळ नेत्यांमुळेच पक्षाचं नुकसान होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

खरगे म्हणाले, सगळ्यांनी एकत्र येत निवडणूक लढली होती. मात्र पराभवानंतर काही नेते हे नेतृत्वाला दोष देत आहेत हे योग्य नाही. अशा काळात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे आणि नेत्यांमुळे पक्षाचं नुकसान होतं. पक्ष कमकूवत बनतो असंही ते म्हणाले. काँग्रेसची विचारधारा नष्ट झाली तर आपण सगळेच संपून जाऊ असंही ते म्हणाले.
या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. परिस्थिती आता हाताबाहेर गेली असून आत्मचिंतन करण्याची वेळही निघून गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांचे समर्थक आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनी सिब्बल यांच्या विरुद्ध हल्लाबोल केला आहे. उगाच फुकाचे सल्ले देण्यापेक्षा अशा नेत्यांनी काँग्रेस सोडून जावं अशी टीका काँग्रेसचे ज्येठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती.

 

 

चौधरी म्हणाले, बिहारमधल्या पराभवानंतर अशा वाचाळ नेत्यांना जास्तच जोर चढला आहे. हे नेते कधीही निवडणुकीत विजयी होत नाही. पक्ष संकटांचा सामना करत असताना अशा वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते. ज्यांना काँग्रेस योग्य वाटत नसेल त्यांनी अशा लज्जास्पद गोष्टी करण्यापेक्षा पक्षातून निघून जावं, वेगळा पक्ष स्थापन करावा किंवा इतर पक्षात सामील व्हावं. मात्र उगाच सल्ले देत आपला वेळ वाया घालवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here