मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

hafeez-saeed

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील कोर्टाने मुंबई हल्ल्यामगचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी आणि त्यामधील सहभागामुळे लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी दहशतवादी हाफिज सईदसमवेत जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

 

संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर गेल्या वर्षी 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना 10 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हाफिजचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

हाफिज सईदला यापूर्वीदेखील कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्कर ए तोयबाची फ्रंट ऑर्गनायझेशन जमात-उद-दावाचा प्रमुख असलेल्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी फेब्रुवारी 2020 मध्ये 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात कसाब आणि इतर दहशतवाद्यांना हाफिजने फोनद्वारे माहिती पुरवली होती. पाकिस्तान सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे तो पाकिस्तान सोडून जाऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here